पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

 




छत्रपती संभाजीनगर, दि.१२ (जिमाका):- जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी राबविण्यात येणारा वेरुळ अजिंठा महोत्सव यंदा दि.२, ३ व ४ फेब्रुवारी रोजी सोनेरी महाल,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर येथे होत आहे. या महोत्सवात जिल्हावासियांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आज जिल्हाधिकारी तथा वेरूळ अजिंठा  आंतरराष्ट्रीय समिती 2024 चे अध्यक्ष आस्तिककुमार पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत केले.

वेरुळ अजिंठा महोत्सवाचे आयोजन  वेरूळ अजिंठा  आंतरराष्ट्रीय समिती 2024 तर्फे करण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेस राज्य आयुक्त, लोकसेवा हक्क आयोग, पुणे दिलीप शिंदे,जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजन समिती आस्तिककुमार पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त तथा सहअध्यक्ष, वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समीती जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया,   राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे आदी उपस्थित होते.

पर्यटन विभागाचे विजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की,    पर्यटन वाढीसाठी जागतिक स्तरावर छत्रपती संभाजीनगर जिल्हयाची ओळख प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालय सातत्याने  प्रयत्न करते. विविध सेमीनार, परिषदा इ. चे आयोजन करुन अधिकाधिक पर्यटक येतील यासाठी प्रयत्न करते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 1985 पासुन वेरुळ येथील कैलास लेणी समोरील जागेमध्ये जगविख्यात वेरूळ महोत्सव आयोजित करण्याची सुरूवात केली होती.  सदर महोत्सवाचे  रूपांतर 2002 पासुन वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात करण्यात आले.  सदर महोत्सव जिल्हा प्रशासन, संयोजन समीती व पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात येतो. प्रतिवर्षी प्रमाणे सन 2016 साली वेरूळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  मागच्या काही काळात विविध कारणामुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता. याच वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये 7 वर्षानंतर अजिंठा- वेरूळ महोत्सव 2023 घेण्यात आला. त्याच प्रमाणे या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये 2,3 व 4 फेब्रुवारी 2024 या कालावधी मध्ये महोत्सव घेण्याचे निश्चित केले आहे.         जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की, वेरूळ -अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवा निमित्त पर्यटनाला चालना देण्याची व भारतीय अभिजात कला,नृत्य,साहित्य-संस्कृती यांच्या प्रचाराची मोठी संधी मिळाली आहे. या वर्षी दि. 2,3 व 4 फेब्रुवारी 2024 रोजी सोनेरी महाल येथे जागतिक दर्जाच्या सुप्रसिध्द कलाकारांमार्फत शास्त्रीय व उपशास्रीय, गायन, वादन व शास्त्रीय नृत्य इ. सादर केले जाणार आहे.  सदर महोत्सवामध्ये श्रीमती संध्या पुरेचा व चमु, श्रीमती अनुराधा पाल व चमु, श्री राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे, श्री अमान व अयान, श्री कैलाश खेर तसेच वैदेही परशूरामी, उर्मिला कानेटकर- कोठारी, श्रेया घोषाल व इतर कलाकार कला सादर करणार आहेत.

मान्यवरांच्या हस्ते शनिवारी होणार उद्घाटन !

पूर्वरंग हा वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची नांदी असलेला पूर्वरंग कार्यक्रमाने महोत्सवाला सुरुवात होईल. याचे उद्घाटन शनिवारी दि. 20 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री - रेल्वे, कोळसा व खाण रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री वित्त डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे हे अध्यक्षस्थानी असतील. अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे सह अध्यक्ष असतील. प्रमुख पाहुणे विरोधी पक्ष नेता विधान परिषद अंबादास दानवे तसेच खा. इम्तियाज जलील, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ.हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. प्रशांत बंब, आ. उदयसिंग राजपूत, आ. रमेश बोरनारे यांचीही उपस्थिती असेल. या कार्यक्रमासाठी राज्य आयुक्त, लोकसेवा हक्क आयोग, पुणे दिलीप शिंदे यांची विशेष  उपस्थित असेल.

पूर्वरंग उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजन समिती आस्तिककुमार पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त तथा सहअध्यक्ष, वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समीती जी. श्रीकांत यांनी केले.

पूर्वरंग ने होईल महोत्सवाची सुरुवात

वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची घोषणा करणारा पूर्वरंग कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्त करण्यात आले असून 20 व 21 जानेवारी 2024 शनिवार व रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम होत आहे. संत एकनाथ रंगमंदिर येथे होत असलेल्या या कार्यक्रमात विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. त्यात शनिवार 20 रोजी सायं वा. उदघाटन सोहळा, सांय 7 ते 07.40 अनुभूतीकथ्थक नृत्य श्रीमती निधी प्रभु व सहकारी सादर करतील, सायं 7.40 ते 8.20 वा. महाराष्ट्राची लोकगाणी शाहीर रामानंद उगले,रात्री 8.30 ते 10.00 वा.लोकोत्सव प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे सह लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर, प्रमिला लोदगेकर व ढोलकी सम्राट पाडुंरंग घोटकर,कृष्णा मुसळे.रविवार दिनांक 21 रोजी सांय 06.45 वा. तबला वादन सई बारबोटे, सायं 7 ते 7.30 वा. सतार वादर डॉ. स्विकार कटटी, सायं 7.30 ते 10 वा. अविनाश विश्वजीत लाईव्ह इन कॉन्सर्ट  सोबत रोहित राऊत, मधुरा कुंभार, दिप्ती भागवत व रवींद्र खोमणे.

महोत्सवानिमित्त पूरक कार्यक्रमांची रेलचेल

वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त यंदा शहरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गायन वादन सादरीकरण यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘पूर्वरंग’ कार्यक्रमानंतर हे कार्यक्रम होतील. यामध्ये दि.23 रोजी कॅनाट प्लेस येथे दि. 25 क्रांती चौकात तसेच दि. 28 रोजी छावणी येथे लोककलांचे सादरीकरण होईल.

त्यात  मंगळवार दि. 23 रोजी सांय.06.00 ते 10.00 वा. खयाल ए बंदिश एम 4फ्युजन रॉक बँड विथ सुफी

सागर म्हात्रे, कैवल्य केजकर, महेश बधे,चंद्रकांत उनावने च ओंकार इंगावले,स्थळ:- कॅनाट प्लेस सिडको, गुरूवार दि.25 रोजी  सांय 06.00 वा. पर्यटनाची जागर ज्योत प्रजाकसत्ताक दिन पूर्वसंध्या व पर्यटन दिनानिमित्त विशेष आयोजन  उपस्थिती प्रख्यात अभिनेत्री जुई गडकरी स्थळ:- क्रांती चौक (झांशीची राणी पुतळा),  रविवार 28 रोजी  सांय 6 ते 10 देश मेरा रंगीला, देशभक्ती – हिंदी मराठी गीते-नृत्य, सुत्रसंचालन:- दिप्ती भागवत (अभिनेत्री), आर जे प्रेषित रुद्रवार, नीता पाणसरे व किरण देशपांडे स्थळ:- छावणी (कॅन्टान्मेंट परिसर)

 

 वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव हा दिनांक 2 फेब्रुवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी सोनेरी महाल,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर येथे होत आहे. शुक्रवार दि.2 फेब्रुवारी सायं 7.00 ते 8.00 वा. डॉ. संध्या पुरेचा व चमु यांचे भरतनाट्यम् नृत्य, रात्री 8.00 ते 9.00 वा. अनुराधा पाल व चमु यांचे वादन, रात्री 9.00 ते 11.00 राहूल देशपांडे व प्रियंका बर्वे यांचे शास्रीय/ उपशास्त्रीय  गायन. शनिवार दि.3 फेब्रुवारी सायं 7.00 ते 8.00 वा. श्री. अमान व अयान यांचे सरोद वादन,रात्री 8.00 ते 10.00 वा. कैलाश खेर व चमू यांचे सुफी सादरीकरण. शनिवार दि. 3 फेब्रुवारी सांय 7.00 ते 7.45 वा. श्रीमती वैदेही परशुरामी व उर्मीला कानेटकर- कोठारी यांचे कथ्थक, रात्री 8.00 ते 10.30 वा. श्रीमती श्रेया घोषाल व चमु यांचे सादरीकरण.

महोत्सव पश्चात उत्तररंग हा कार्यक्रम दि. 10 फेब्रुवारी  रोजी संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्यात सायं 7.00 ते 9.30 वा. पं. विजय घाटे यांचे ताल दिंडी व ममता जोशी यांचा सुफीचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

पत्रकार परिषदेनंतर सर्व मान्यवरांनी वेरुळ अजिंठा महोत्सवाचा प्रचार मराठवाड्यातील जिल्ह्यात करण्यासाठी सुसज्ज वाहनाची रवानगी केली.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा