Posts

Showing posts from June, 2026

हरित क्रांतीचे जनक, वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
  ​ छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका)- वसंतराव नाईक हे ​ हरित क्रांतीचे जनक असून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी शेती आणि सिंचनाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणले. त्यांनी प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री म्हणून सेवा बजावत महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला. असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी डॉ.संभाजी अडकूणे यांनी   वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात केले.त्यांनी   वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी   जनार्दन विधाते, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संगीता राठोड उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, त्यांनी   वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. 00000

मुख्य अभियंता मृद व जलसंधारण यांचे कार्यालय गुरुवार (दि.२) पासून कार्यान्वित

  छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- जिल्ह्यातील मुख्य अभियंता मृद व जलसंधारण हे कार्यालय गुरुवार दि.२ जुलै पासून कार्यान्वित होणार आहे.मुख्य अभियंता म्हणून हरिभाऊ गिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात मृद व जलसंधारण विभागाच्या दि.२७ मे च्या शासन निर्णयानुसार मुख्य अभियंता मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यालयाचे कार्यक्षेत्र छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील ८ तसेच नाशिक प्रादेशिक विभागातील ५ असे एकूण १३ जिल्ह्यांचे असणार आहे.या कार्यालयाचे पहिले मुख्य अभियंता म्हणून हरिभाऊ गिते यांची करण्यात आली आहे.आयुक्त मृद व जलसंधारण यांनी त्यांचेकडे हा पदभार देण्यात आला आहे. वाल्मी परिसर, कांचन वाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे हे कार्यालय दि.२ जुलै पासून कार्यान्वित होईल. या कार्यालयाचे उद्घाटन दि.२ जुलै रोजी दुपारी १२ वा. होणार आहे,असे प्रादेशिक दक्षता व गुणनियंत्रण अधिकारी, दक्षता व गुण नियंत्रण पथक (मृद व जलसंधारण) छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे. ०००००

विशेष लेखः- पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना जाणून घ्या कर्जमुक्तीची प्रक्रिया

Image
            शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून कायमची मुक्तता मिळविण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली  आहे. राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. अनेक टप्प्यांवर कामकाज             ही कर्जमुक्तीची प्रक्रिया राबविण्यासाठी अनेक टप्प्यांवर कामकाज होत आहे. विशेष म्हणजे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन व गतिमान पद्धतीने करण्यात येत आहे. कर्ज वा अन्य प्रकारचे आर्थिक व्यवहार ज्या बॅंकांद्वारे होत असतात, त्या बॅंकांमधून ही प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासोबतच सहकाराचे ग्रामिण भागापर्यंत जाळे असलेल्या आपल्या राज्यात सहकार विभागांतर्गत येणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्या, कृषी पतसंस्था, सहकारी बॅंका इ. मार्फतही ही प्रक्रिया राबविली जात आहे. समन्वय यंत्रणा           ...

अति.वाळूज औद्योगिक वसाहत भूसंपादन; जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची बैठक

Image
  छत्रपती संभाजीनगर,दि.३०(जिमाका)- नियोजित अति.वाळूज औद्योगिक वसाहत क्षेत्र भूसंपादनाबाबत आज आरापूर, सुलतानाबाद, गवळी शिवरा ता. गंगापुर येथील शेतकऱ्यांची आज जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली. त्यात त्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांच्या मागण्या कळविण्यात येतील, असे त्यांनी आश्वस्त केले.             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात नियोजित औद्योगिक वसाहतीकरीता भूसंपादन करावयाच्या जमिन दरांच्या वाटाघाटीबाबत बैठक पार पडली. बैठकीस उपजिल्हाधिकारी (भुसंपादन)एकनाथ बंगाळे, प्रादेशीक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक वसाहत अमित भामरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी तसेच अन्य अधिकारी व ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.             नियोजित अति. वाळूज औद्योगिक वसाहतीसाठी आरापुर येथील १७१.८० हेक्टर, सुलतानाबाद येथील १७७.६२ हेक्टर तर गवळी शिवरा येथील ४१२.६१ हेक्टर क्षेत्र  ...

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- केंद्र शासनातर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठित 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार - २०२६ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना गौरवण्यासाठी केंद्र सरकारने पात्र बालकांकडून किंवा त्यांच्या वतीने संस्थांकडून नामनिर्देशन (Nominations) मागविले आहेत. यासाठी https://awards.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत. राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या बालकांना प्रदान केला जातो.यात शौर्य,क्रीडा,समाजसेवा,विज्ञान आणि तंत्रज्ञान,पर्यावरण,कला आणि संस्कृती,नवोन्मेष (Innovation)याचा समावेश आहे. अर्ज करण्यासाठी   बालकाचे वय ५ वर्षांपेक्षा जास्त आणि ३१ जुलै २०२६ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी असावे. अर्ज केवळ*https://awards.gov.in* या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. स्वतः बालक, पालक, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश प्रशासन, जिल्हाधिकारी, पंचायती राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था किंवा शैक्षणिक संस्था संबंधित बालकाचे नाव पुरस्कारासाठी सुचवू शकतात...

* विद्यार्थी प्रवेश प्रक्रियासाठी जात वैधता प्रमाणपत्र वितरणासाठी विशेष मोहीमेचे आयोजन*

  छत्रपती संभाजीनगर, दि२९(जिमाका)- राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम दिनांक २६ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे.   शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेले आणि १२ वी नंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, विधी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी या मोहिमेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये अनुसूचित जाती (SC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC) आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.   इच्छुक विद्यार्थ्यांनी https://ccvis.barti.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा....

*वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९( जिमाका)- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या, २५% बीजभांडवल   कर्ज योजना, एक लाख रुपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना,या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. एस. आर. बडगुजर यांनी केले आहे. या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी https://www.vnvjntdc.org/ या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले   आले आहे.    वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि त्यांच्या अधिपत्याखालील उपकंपन्या, ज्यामध्ये राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, ब्रम्हलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ आणि श्री. शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ यांचा समावेश आहे, त्यांच्यामार्फत विविध कर्ज योजना राबविण...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची उपक्रम

  मुंबई, दि. २९: आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे 'चरण सेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, विविध आरोग्य संस्था, सेवाभावी संघटना तसेच स्वयंसेवक यांच्या समन्वयातून पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या चरणसेवेला प्रारंभ झाला आहे. त्यात आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार आणि आरोग्य जनजागृतीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.   चरण सेवेकरिता समन्वय वारकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या 'चरण सेवा' उपक्रमात सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या ११ प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे. पालखी मार्गावरील सुमारे ४०० विश्रांती व मुक्काम स्थळी वारकऱ्यांसाठी चरण सेवा, वैद्यकीय तपासणी, प्राथमिक उपचार तसेच आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.   ...

कामगार कल्याण मंडळाचा ७३ व्या वर्धापन दिनःबुधवारी (दि.१ जुलै) संगीत रजनी

  छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- कामगार कल्याण मंडळाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित   महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयाच्या वतीने बुधवार दि.१ जुलै रोजी   स्वागत समारंभ, संगीत रजनी अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन ललित कला भवन उस्मानपुरा येथे करण्यात आले आहे.             याप्रसंगी निर्माता, गायक तथा संगीतकार मंगलसिंग सोळंके प्रस्तुत स्वरधारा हा सुमधुर मराठी हिंदी गीतांच्या संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.             महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे कामगार व कामगार कुटुंबीयांचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासाचे उद्दिष्ट्य ठेवून विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांच्या माध्यमातून कामगार व कामगार कुटुंबियांच्या उत्कर्ष करण्यासाठी कार्यरत आहे. यासाठी शिष्यवृत्ती( सर्वसाधारण, क्रीडा, परदेशी), पाठ्यपुस्तक- एम एस सी आय टी - टायपिंग - चारचाकी वाहन चालक अर्थसहाय्यता योजना, गंभीर आजार वैद्यकीय अर्थसहाय्यता योजना, इत्...

‘अमृत’ तर्फे लोकसेवा आयोग परीक्षा मार्गदर्शन; ऑनलाईन अर्ज मागविले

Image
    छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका)- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना सन २०२६-२७मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.   अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहाणा, कानबी आदी समाजघटकांचा समावेश आहे. सन २०२६-२७ मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२६मध्ये उत्तीर्ण झालेल्या व या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळावरिल संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार ऑनलाइन अर्ज भरावा. योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या ...

विशेष लेखः- कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित

              राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी “ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ” जाहीर केली   असून या योजनेचा लाभ ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने कंबर कसली आहे. या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी   सर्व व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सहकार विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना   देण्यात   आल्या आहेत.             योजनेचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांचा सविस्तर तपशील मागवण्यात येत आहे. बँकांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले   आहेत. या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून बँकांन...

संत एकनाथ महाराज पालखी सोहळा: वारकऱ्यांसाठी सर्व विभागाकडून सुविधांची सज्जता- अपर जिल्हाधिकारी डॉ.संभाजी अडकूणे

Image
    छत्रपती संभाजीनगर: दि.२५(जिमाका) येत्या ७ जुलै रोजी पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान   पंढरपूर कडे होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या   वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि सुरक्षितता ,आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ. संभाजी अडकुणे यांनी दिले . पैठण येथील नाथ मंदिर परिसरातील सभागृहात पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.   या बैठकीस पैठण-फुलंब्री विभागाच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी श्रीमती मनोरमा गायकवाड, नगरपालिका मुख्याधिकारी श्रीमती अंभोरे , जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी   डॉ. सारिका लांडगे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. बी. ढोले तालुका वैद्यकीय अधिकारी पी एम जाधव, सहायक पोलीस निरीक्षक श्री शेडगे, जलसंधारण, महावितरणचे अधिकारी, संत एकनाथ महाराज   संस्थानचे   कार्यकारी विश्वस्त श्री.   बाजीराव बारे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पा...

विशेष लेख : महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय

    शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कुशल प्रशासक, रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकाभिमुख शासक होत्या. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेले प्रोत्साहन आजही आदर्श मानले जाते. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. म्हणूनच त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडित या महत्त्वपूर्ण योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना हे नाव देऊन शासनाने त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी...