चित्रीकरण पथके म्हणजे प्रशासनाचे डोळे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका):- निवडणूक कालावधीत विविध प्रक्रियांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी नेमलेली चित्रीकरण पथके म्हणजे प्रशासनाचे डोळे आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण हे निष्पक्षतेने करावे असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यासाठी चित्रीकरण पथकांची
नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन सभागृहात आज प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हा
कोषागार अधिकारी शेखर कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी पथकांना
प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण प्रमुख म्हणून डॉ. अभिराम डबीर हे उपस्थित होते. प्रशिक्षण
सत्रास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या समवेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र
कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, चित्रीकरण चमूने प्रत्येक बाबीचे
चित्रीकरण काळजीपूर्वक करावयाचे आहे. आपण केलेले चित्रीकरण हे पुरावा म्हणून नोंदविले
जाणार आहे याचे भान असू द्यावे. प्रामुख्याने कायदा सुव्यवस्था, आचार संहिता आणि खर्च
निरीक्षण या तीन उद्देशांसाठी हे चित्रीकरण केले जाते हे लक्षात ठेवा. चित्रीकरण चमूने या कालावधीत आपले ओळखपत्र सोबत
बाळगावे. चित्रीकरण करतांना संयमित व सौजन्यपूर्ण वागणूक ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी
स्वामी यांनी दिले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके व उपजिल्हाधिकारी प्रभोदय
मुळे यांनीही चित्रीकरण पथकांशी संवाद साधून
त्यांना सुचना दिल्या.
०००००
Comments
Post a Comment