पैठण येथे नाथषष्ठी यात्रा पूर्वतयारीआढावा: यात्रेकरुंसाठी सर्व आवश्यक सुविधा द्याव्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- नाथषष्ठी यात्रेसाठी पैठण येथे येणाऱ्या यात्रेकरुंसाठी स्वच्छता, सुव्यवस्था आणि सुविधा पुरविण्यात याव्या, त्यासाठी प्रशासनाने सर्व सज्जता करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथे दिले.
पैठण तहसील कार्यालयामध्ये नाथषष्ठी यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला. तहसीलदार स्वप्निल चव्हाण पैठण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, तालुकास्तरीय विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी
म्हणाले की, नाथषष्ठीच्या यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून
द्याव्या. षष्ठीच्या निमित्ताने पाच ते सात दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवात विविध
ठिकाणावरून दिंड्याच्या माध्यमातून नागरिक आणि भाविक सहभागी होतात. त्यांना पिण्याचे
पाणी, स्वच्छता, रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था, स्वच्छता गृह, महिला यात्रेकरुंसाठी
कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, आरोग्य तपासणी कक्ष आदी सुविधा प्रशासनाने उपलब्ध
करुन द्याव्या. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी. तसेच आरोग्य सुविधा
उपलब्ध करून द्याव्यात. आरोग्य तपासणीसाठी आरोग्य पथक, आरोग्य विभागाने डॉक्टर्स आणि
संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. आवश्यक
वैद्यकीय साहित्य, औषधे साठा ठेवावा. महिला डॉक्टर्सची नियुक्ती करुन महिला वारकऱ्यांसाठी
आरोग्य सुविधा द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
०००००



Comments
Post a Comment