जिल्हाधिकारी तहसिलच्या दारी: शिधापत्रिका, अर्थसहाय्य योजना, प्रलंबित जमिन मोजणी;असे अनेक प्रश्न तात्काळ निकाली
छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका)- जिल्हाधिकारी तहसिलच्या दारी या उपक्रमामुळे आज अनेक नागरिकांचे तात्काळ प्रश्न निकाली निघाले. त्यात प्रामुख्याने शिधापत्रिका, सामाजिक अर्थसहाय्य योजना, जमिनीच्या मोजणीचे प्रलंबित प्रकरणे,फेरफार प्रकरणेशा एक ना अनेक समस्या निकाली काढण्यात आल्या. अनेक प्रकरणांमध्ये ई केवायसी प्रलंबित असल्याने लाभार्थ्यांना लाभ मिळण्यात विलंब होत आहे. त्यासाठी संबंधितांनी आपले ई- केवायसी लगेचच करुन घ्यावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हाधिकारी तहसिलच्या दारी या उपक्रमांतर्गत
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज तहसील कचेरी येथे आलेल्या अभ्यागतांना दुरदृष्य
प्रणालीद्वारे संवाद साधला.
सिल्लोड तालुक्यातील सदाशिव बिरगे रा.
शिरसाखेडा यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान प्रलंबित होते. त्यासाठी
ई-केवायसी झालेले नव्हते. ते झाल्यास लगेच खात्यात परस्पर पैसे जमा होतील असे सांगण्यात
आले. तसेच लिलाबाई कांबळे, कमलाबाई लोखंडे यांच्या शिधापत्रिकांचा प्रश्न होता. त्यांना
आजच शिधापत्रिका देण्यात आल्या. घाटनांद्रा येथील
अमोल मोरे यांच्या सातबारा उताऱ्यावर दिसणारा बॅंक कर्जाचा बोजा कमी करावयाचा
आहे, त्यासाठी तहसिलदार यांनी तात्काळ कारवाई करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी
यांनी दिले. खुलताबाद येथील सुनिल जाधव रा. कवीटखेडा यांच्या शिधापत्रिकेचा प्रश्नही
लगेचच निकाली काढण्यात आला. फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील समीर पठाण यांच्या तुकडेबंदी
अंतर्गत जमिन मोजणीसंदर्भात आजच पत्र देण्यात आले. हा प्रश्न गेल्या ७ वर्षांपासून
प्रलंबित होता. तेथीलच जनाबाई देवकर यांचे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान ईकेवायसी
अभावी रखडले असून त्यांचेही तात्काळ ई-केवायसी करावे असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी
यांनी दिले. हरसूल येथील फेरफार प्रलंबित प्रकरणी तलाठ्याची चौकशी करुन आठवड्यात निकाल
द्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की,
लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याचे कष्ट घ्यावे लागू नये तसेच त्यांचा खर्च
व वेळ वाचावा म्हणून हा उपक्रम सुरु केला आहे. लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात न येता
आपल्या तक्रारी, निवेदने हे तहसिलदार कचेरीत दर सोमवार व गुरुवारी सादर करावे.
अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, निवासी
उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर हे मुख्यालयातून तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार
व नागरिक हे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
०००००

.jpeg)


Comments
Post a Comment