जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक शालेय पोषण आहार, वसतिगृह, आश्रमशाळा, रुग्णालयांना गॅस पुरवठा अविरत ठेवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका)- जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे.
तथापि,शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा मध्यान्न पोषण आहार, आदिवासी विकास विभागाची,
सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहाची तसेच आश्रमशाळांची भोजनालये, रुग्णालयांमध्ये
रुग्णांच्या अन्नपदार्थांसाठी स्वयंपाकाचा गॅस अविरत उपलब्ध ठेवावा, असे निर्देश आज
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी गॅस वितरण कंपनीला दिले. हे वितरण सुरळीत सुरु
रहावे याबाबत पुरवठा विभागाने देखरेख ठेवावी,असेही निर्देश त्यांनी दिले.
गॅस वितरकांकडे तपासण्या
जिल्ह्यात गॅस तुटवड्याच्या अफवांमुळे लोकांनी गॅस एजन्सी समोर
रांगा लावल्याचे निदर्शनास आले. याबाबत आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्वच गॅस
वितरण एजन्सीच्या तपासण्या करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला दिले. त्यानुसार गॅस वितरकांकडे
जाऊन तपासण्या केल्या. जिल्ह्यात यासाठी ११ पथके नियुक्त करण्यात आले होते. त्यात गोडावून
तपासणी, वितरण प्रणाली तपासणी, बुकींग ते प्रत्यक्ष सिलिंडर ग्राहकांना देणे यात कोणतीही
अनियमितता, साठेबाजी होऊ नये, यासाठी तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार
आज जिल्हाभरात या तपासण्या झाल्या. जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा असून विहित
केलेल्या मुदतीत बुकींग केल्यापासून सिलिंडर ग्राहकांना मिळेल,असे जिल्हाधिकारी दिलीप
स्वामी यांनी सांगितले.
उद्योजकांची बैठक
दुपारनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजक संघटना, पुरवठा विभाग,
गॅस वितरक कंपनी, शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, उच्च शिक्षण
विभाग आदींची संयुक्त बैठक घेण्यात आली.
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,
प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग चेतना मोरे, सहा. प्रकल्प अधिकारी डॉ उद्धव वायाळ,
सामाजिक न्याय विभागाचे सहा. आयुक्त रविंद्र शिंदे, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन
लि.चे शुभम चौहान, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन
लि.चे नितीन बजाज, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी
अमित भामरे, ऑरिक सिटीचे महेश शिंदे, मसिआ चे अध्यक्ष अर्जून गायकवाड, कार्यकारी अभियंता
रमेशचंद्र गिरी, तसेच अन्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
उद्योजकांचे म्हणणे
शासनाकडे पाठवणार
उद्योगांना गॅस पुरवठा करण्याबाबत प्राधान्यक्रम ठरवून नेमके काय धोरण असावे? याबाबत
शासनास उद्योजक संघटनांच्या निवेदनासह प्रस्ताव पाठविण्यात येईल. रुग्णालयांना अत्यावश्यक
साहित्य, पदार्थ देणारे उद्योग आहेत. अशा उद्योगांना आवश्यकतेनुसार गॅस पुरवठा करता
यावा यासाठी तरतूद असावी,अशी मागणी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. त्यांचे म्हणणे
शासनास कळवावे,असे निर्देश पापळकर यांनी दिले.
हॉटेल व्यावसायिकांनीही आपले निवेदन
केले. त्यांचे निवेदनही शासनाकडे पाठविण्यात यावे,असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी, रुग्ण
यांच्या अन्नासाठी पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश
जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या
१० आश्रम शाळा असून त्यात ३५२२ विद्यार्थ्यांना जेवण द्यावे लागते. त्यासाठी दररोज
२५ सिलींडर लागतात. ते पुरविण्यात येतील. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी मागणी प्रमाणित
करुन द्यावी,असेही सांगण्यात आले. त्याच प्रमाणे ३१६६ शाळांना शालेय पोषण आहार बनविण्यासाठी
तसेच शालेय पोषण आहाराची सामुहिक स्वयंपाक घरे यांनाही सिलींडर पुरवठा सुरळीत सुरु
राहील. अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा थेट लाभ दिला जातो. असे विद्यार्थी खाजगी
खानावळीत जेवणाऱ्या मुलांच्या जेवणाची गैरसोय
होत असल्यास महाविद्यालये, शाळा यांनी विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी स्वयंपाक गृहाची
व्यवस्था करावी. त्यांना सिलिंडर उपलब्ध करुन देण्यात येईल. रुग्णालयांमध्ये रुग्णांना
आवश्यक जेवण, पेय बनविण्यासाठी तसेच उपचारासाठी आवश्यक तेथे गॅस लागत असल्यास तेथेही
गॅस उपलब्ध करुन दिला जाईल. विज्ञान शाखेच्या
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षीक परीक्षांसाठी (रसायनशास्त्र इ.) गॅस लागतो तो ही उपलब्ध
करुन द्यावा,असे निर्देश पापळकर यांनी दिले.
साठेबाजी, काळा बाजार
केल्यास कारवाईचे निर्देश
सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी गॅस कंपन्यांच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या
संपर्कात रहावे व आपली आवश्यकता कळवावी. प्राप्त परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात
कुठेही गॅसची साठेबाजी, जादा दराने विक्री होत असल्यास तेथे कारवाई करावी,असे निर्देशही
पापळकर यांनी दिले.
०००००




Comments
Post a Comment