जिल्हा गंथोत्सवाचे थाटात उद्घाटन; सुजाण समाज घडविण्यासाठी ग्रंथ वाचनाची चळवळ व्हावी- पुरुषोत्तम भापकर
छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका)- ग्रंथ वाचनातून अनेक व्यक्तिमत्व
घडले. परिवर्तन घडविण्याचे काम ग्रंथ करत असतात. अशी ही ग्रंथ वाचनाची चळवळ ही सुजाण
समाज घडविण्यासाठी आवश्यक असून त्यास समाजाचे पाठबळ असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन
माजी सनदी अधिकारी पुरुषोत्तम भापकर यांनी आज केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचलनालय व जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालय, यांच्या वतीने जिल्हास्तरीय छत्रपती संभाजीनगर ग्रंथोत्सव २०२५ चे
आयोजन करण्यात आले आहे. आज या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन झाले.
ग्रंथ दिंडीने प्रारंभ
आज सकाळी ९ वा. ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथ दिंडी क्रांती
चौकातून निघाली.महापौर समीर राजुरकर यांच्या
हस्ते या दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. दिंडीत संविधान ग्रंथ ठेवून त्याची पालखीतून
मिरवणूक काढण्यात आली. वरिष्ठ कोषागार /-अधिकारी वैजनाथ शेळके, मानव विकास आयुक्तालयाचे
सहाय्यक आयुक्त सुनिल सुर्यवंशी, प्रकाशक संघटनेचे कुंडलिक अतकरे, शिक्षण विस्तार अधिकारी
जालम चौरे, सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अधिकारी सुभाष
साबळे आदी मान्यवर व पारंपारिक वेषभूषा केलेले शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यात सहभागी
झाले होते.
ग्रंथ प्रदर्शनाचे
उद्घाटन
समता दर्शन वाचनालय सभागृह, समता नगर येथे ग्रंथोत्सवाचे मुख्य
आयोजन करण्यात आले होते. तेथील प्रांगणात स्थापीत केलेल्या ग्रंथ प्रदर्शन स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी
माजी सनदी अधिकारी पुरुषोत्तम भापकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, जिल्हा ग्रंथालय
अधिकारी संतोष जाधव, ज्येष्ठ साहित्यीक डॉ. दादा गोरे, ग्रंथ निवड समिती सदस्य गुलाबराव
मगर आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर दीपप्रज्वलनाने मुख्य सोहळ्यास
प्रारंभ झाला.
ग्रंथालये हीच तीर्थक्षेत्र
आपल्या उद्घाटनपर भाषणात श्री. भापकर म्हणाले की,ग्रंथोत्सव
म्हणजे साहित्य आणि शिक्षणाची वारी असून आपण सारेत्याचे वारकरी आहोत. ग्रंथालयांना
आपण आपली तीर्थक्षेत्रे मानली पाहिजेत. ग्रंथसंपदा ही आपल्या प्रगतीचे दिशा दाखवते.
ज्ञान आणि माहितीच्या या प्रवाहात वाचक ते ग्रंथनिर्मिती क्षेत्रातील प्रत्येकाचे योगदान
आहे.समाज सुजाण बनविण्यात ग्रंथांचे मोठे योगदान आहे.मुल्यवान समाज बनवायचा संकल्प
आपण साऱ्यांनी करुन त्यासाठी ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमांना पाठबळ द्यायला हवे.प्रत्येक
गावात ग्रंथालय आवश्यक आहे. खेळणं आणि वाचणं यातून समृद्ध व्यक्तिमत्व आकाराला येतं.
मानवी समाजाचे वैचारीक भरण पोषण पुस्तकांमुळे होते,असेही श्री, भापकर यांनी सांगितले.
ग्रंथालय दुपारच्या सत्रात ‘कृत्रिम
बुद्धीमत्ता आणि ग्रंथालये’
या विषयावरील परिसंवाद
पार पडला. अध्यक्षस्थानी डॉ. रा. शं.बालेकर होते. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद
दुसाने, डॉ. गणेश कुलकर्णी, प्रा. अनिल लहाने यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार या परिसंवादात
मांडले. ग्रंथालय चळवळीला, अचूक संदर्भसाहित्य शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही ग्रंथालय चळवळीला नेहमीच
पूरक ठरेल असा विश्वास सर्व वक्त्यांनी व्यक्त केला.
काव्यवाचनाने आली
रंगत
सायंकाळी काव्यवाचन कार्यक्रमामुळे
रंगत आली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा.ललित अधाने हे होते. तर विष्णू सुरासे,
हबीब भंडारे, देवानंद पवार, श्रीमती माधुरी चौधरी,सिंधुताई क्षीरसागर, कावेरी खरात,
भक्ती शिह्रे, धम्मपाल जाधव हे यांनी कवितांचे
सादरीकरण केले.
दुसऱ्या दिवशी भरगच्च
कार्यक्रम
ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवार दि.२५ रोजी सकाळी ११ वा.
‘अहिल्यादेवी होळकर यांचे कार्यः सांस्कृतिक वारसा आणि समाजधारणा’ या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी ॲड वैशाली डोळस राहतील.
प्रा. डॉ. संजय गायकवाड, ॲड. वैशाली कडू, प्रा. महेश खरात हे वक्ते आपले विचार मांडतील.
दुपारी २ वा. कथाकथकन कार्यक्रमात नामदेव निकम, संतोष तांबे, निवृत्ती काळे हे सहभागी
होतील तर गेनू शिंदे हे अध्यक्षस्थानी राहतील.
दुपारी साडेतीन वा. गजल यात्रा या कार्यक्रमात रमेश ठोंबरे,
गिरीश जोशी, ऋषभ कुलकर्णी, अर्जून गायकवाड, अमेय तांदुळजे हे सहभागी होतील. सायं.साडेचार
वा. समारोप व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यीक डॉ.
ऋषिकेश कांबळे हे राहतील. जिल्हा शिक्षणाधिकारी आश्विनी लाठकर, सहा. ग्रंथालय संचालक
सुनिल हुसे, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील. सम्राटसिंग राजपुत, साहित्यिक डी.एस. काटे, ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष
राजेंद्र वाणी आदी मान्यवर उपस्थित राहतील.
दुर्मिळ ग्रंथ खरेदीची
संधी
वाचकांना व ग्रंथप्रेमींना ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ खरेदीची संधी
लाभणार असून विविध परिसंवादांतून वैचारीक मेजवानीही मिळणार आहे.या ग्रंथोत्सवात सहभागाचे
आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष सुनील हुसे, सदस्य जिल्हा शिक्षणाधिकारी आश्विनी
लाठकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह
डॉ. दादा गोरे, प्रकाशक संघटनेचे कुंडलिक अतकरे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुभाष
सोळंके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा सदस्य सचिव सुभाष साबळे यांनी केले आहे.
०००००






Comments
Post a Comment