‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन’ चॅलेंज : विद्यार्थी नव उद्योजकांसाठी प्रोत्साहनपर उपक्रम; सहभागाचे आवाहन

 औरंगाबाद,दि.2 (जिमाका)- विद्यार्थ्यांच्या व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था व विद्यार्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त सुनिल सैंदाणे यांनी केले आहे.

उपक्रमाचा उद्देश- महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना चालना देणे व नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे. यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी नवउद्योजक व त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे तसेच या नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या उपक्रमाचे अनावरण दि. 15 जुलै रोजी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

कोण होऊ शकेल सहभागी ?

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा जास्तीत जास्त तीन विद्यार्थ्यांचा समूह पात्र असेल. तसेच अर्ज करण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी, समूहाकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे.

तीन टप्प्यात आयोजन

हा उपक्रम तीन टप्प्यात आयोजित करण्यात येत आहे.

प्रथम टप्प्यात राज्यातील महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी होईल. त्यानंतर त्या संस्थेतील विद्यार्थी स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये आपल्या नवसंकल्पनांचे अर्ज करू शकतील. संस्थास्तरावर उत्तम दोन संकल्पनांची निवडही प्रथम टप्यात करण्यात येईल.

दुसऱ्या टप्यात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या उत्तम दोन संकल्पनांमधून, सर्वोत्कृष्ट 100 संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड होईल. निवडलेल्या 100 नवउद्योजकांसाठी विशेष एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा होईल. प्रत्येक जिल्ह्यात सादरीकरण सत्रातून सर्वोत्कृष्ट 10 विजेते निवडले जातील. सर्वोत्कृष्ट 10विजेत्यांमध्ये, 30% महिला,  50% औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी व एक जिल्हा एक उत्पादन (One District One Product (ODOP)) संबंधित नवसंकल्पनांना प्राधान्य असेल. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी एक लाख रुपये बीज भांडवल देण्यात येईल.

तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील 10 अश्या एकूण 360 नवउद्योजकांना 12 महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम दिला जाईल; त्यानंतर या 360 नवसंकल्पनांचे राज्यस्तरीय  सादरीकरण होईल. त्यातून सर्वोत्कृष्ट 10 नवउद्योजकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बीज भांडवल देण्यात येईल.

नाविन्यपुर्ण परिसंस्थेचे बळकटीकरण

शैक्षणिक संस्था व जिल्ह्यांसह या उपक्रमाची व्याप्ती वाढवून राज्याची नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विशेष परितोषिकेही दिले जाणार आहेत, हे या उपक्रमाचे आणखीन एक वैशिष्ट्य.

 

 

 

कशी कराल नोंदणी?

अधिक माहिती व नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळ www.msins.in  अथवा स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या  www.schemes.msins.in  या पोर्टलला भेट द्यावी.

या उपक्रमात जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त सुनिल सैंदाणे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा