ग्राहक संरक्षण परिषद बैठक सणांच्या पार्श्वभुमिवर प्रतिबंधात्मक कारवाई राबविण्याचे निर्देश
औरंगाबाद, दि. 4
(जिमाका) – आगामी कालावधी हा विविध सणांचा
आहे. याप्रसंगी मिठाई व तत्सम तयार खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते.
तेव्हा या कालावधीत ग्राहकांना दर्जेदार व सेवनयोग्य खाद्यपदार्थ उचित दारात मिळावे
यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रतिबंधात्मक करावाईचा भाग म्हणून मोहिम राबवुन
विक्री होणारे खाद्यपदार्थ तपासावे, असे निर्देश आजच्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या
बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात
पार पडली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, मोटार वाहन निरीक्षक निलेश लोखंडे,
महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता (शहर) स्मिता वाघमारे, (ग्रामीण) स्मिता बक्षी, पोलीस
निरीक्षक अन्वर शेख, सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले तसेच अशासकीय
सदस्य नानक वेदी, संगीता धारुरकर, डॉ.उज्वला दहिफळे, रावसाहेब नाडे, अमोल चतुर, धनंजय
मुळे, विजय चौधरी, अन्वर शेख, अन्वर अली, इ.उपस्थित होते.
मिठाई व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांना मिठाई, खाद्यपदार्थांची
सेवनाची मुदत लिहिणे बंधनकारक आहे. यासंदर्भात शहरातील तसेच ग्रामीण भागातील मिठाई
विक्रेत्यांकडील मालाची, पॅकिंगची तपासणी व्हावी. सध्याच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर
ही कारवाई मिशनमोडवर व्हावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाला जिल्हा पुरवठा
अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिले. शासनाच्या विविध विभागांकडून दिल्या जाणाऱ्या
सेवांबाबतही समिती सदस्यांनी सुचना केल्या.
ग्राहकांनी खराब खाद्यपदार्थ मिळाल्यास, फसवणुक झाल्यास
1800 222 365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, अशी माहितीही बैठकीत अन्न व
औषध प्रशासन विभागामार्फत देण्यात आली.
00000
Comments
Post a Comment