मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण मराठवाड्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची मुख्यमंत्र्यांकडून प्रतिज्ञा

 







छत्रपती संभाजीनगर, दि.17 (जिमाका)- मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी मंत्रीमंडळ बैठकीत 45 हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचा संकल्प केला आहे, मराठवाड्यात विकासाची कामे सुरू झाली असून यातून मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा  शिक्का आता पुसणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या जनतेला दिली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार  सय्यद इम्तियाज जलील, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, विधान सभा सदस्य  आ. हरिभाऊ बागडे, आ.प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त  जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया तसेच स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फैरी झाडून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्य गीतानंतर मुख्यमंत्र्यांनी  उपस्थितांना मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा विकासाची प्रतिज्ञा दिली.

 उपस्थितांना संबोधित करतांना श्री. शिंदे म्हणाले की, मराठवाड्याच्या  मुक्तिसंग्रामात अनेकांनी  योगदान दिले. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या राष्ट्रीय शाळांमधून या चळवळीची सुरुवात झाली. ‘वंदेमातरमने या चळवळीला गती दिली. विद्यार्थ्यांच्या चळवळीतून या मुक्तिसंग्रामाची सुरुवात झाली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान जनता सदैव स्मरणात ठेवेल.

श्री. शिंदे म्हणाले की, मराठवाडा मुक्तिसंग्रामाची प्रेरणा कायम राखण्यासाठी विभागातील प्रत्येक जिल्ह्यात स्मृतीस्तंभ उभारण्यासाठी दोन कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामुळे पुढील पिढ़्यांना या मुक्तिसंग्रामाची प्रेरणा मिळत राहिल. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी 45 हजार कोटी रुपयांहून अधिक निधीच्या विकास कामांचा संकल्प करण्यात आला आहे

 मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासाच्या पर्वाची ही सुरुवात आहे. जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना सरकार गती देत आहे. ही गती देत असतांना नवे प्रकल्पही कार्यान्वित करण्यात येत आहेत. केंद्रशासनाच्या मदतीनेही अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यासाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. मराठवाड्यात रस्ते विकास, आरोग्य , शिक्षण, सिंचन, कृषी अशा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मराठवाड्याची भुमि ही इथल्या जनतेने मोठ्या कष्टाने समृद्ध केली आहे. सध्या पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून यंदा एक रुपयात पीक विमा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना जी  मदत लागेल ती मदत देण्यास शासन कटीबद्ध आहे. मराठवाड्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. मराठवाड्याला विकासित प्रदेश म्हणून आपण पुढे नेण्याचा संकल्प करु या,असे आवाहन यावेळी श्री. शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांशी संवाद

ध्वजारोहण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी  उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर स्मृतिसंग्रहालयास भेट देऊन पाहणी केली.

विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब बेलदार, उपायुक्त जगदीश मनियार,  ॲलिस पोरे, अनंत गव्हाणे, सुरेश बेदमुथा,  भारत कदम, तहसिलदार  अरुण पावडे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

विभागीय माहिती कार्यालयात ध्वजारोहण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या येथील विभागीय माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास माहिती अधिकारी डॉ.मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे, डॉ.श्याम टरके आदींसह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

00000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा