नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा नृत्य, गीतांतून केली महिला सक्षमीकरणाची जाणीव जागृती

 






छत्रपती संभाजीनगर,दि.१९(जिमाका):- आदिशक्तीच्या सामर्थ्याचा परिचय गीत,संगित आणि नृत्यातून करुन देतांनाच महिलांच्या सक्षमीकरणाची जाणीव जागृती करणारा सर्वांग सुंदर असा ‘नवदुर्गा:  जागर स्त्री शक्तीचा’  हा बहारदार व प्रबोधनपर कार्यक्रम सादर झाला. नवरात्रोत्सवाच्या भक्तिपर्वात शासनाच्या महिला व बालकल्याणाच्या योजनांबाबत महिलांमध्ये जाणीव जागृती करण्यात आली.

 महिला बालकल्याण विभागाच्या योजनांची माहिती सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संत एकनाथ रंगमंदिर येथे करण्यात आली. नृत्य -गीत आणि विविध शासकीय योजनांच्या माहितीचा समन्वय आणि राज्यातील साडेतीन शक्तीपिठांबाबत माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना देण्यात आली.       

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना, आधारगृह, वैद्यकीय मदत,  बेटी बचाव बेटी पढाओ,  इंदिरा गांधी मातृत्व सहयोगी योजना या महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती  माहितीपटाद्वारे देण्यात आली.  राज्यातील स्त्री शक्तीचे दर्शन साडेतीन शक्तीपीठाच्या अध्यात्मिक माहितीचे महाराष्ट्राच्या संस्कृती, कला आणि पारंपारिक नृत्य गीताच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. कोळी गीत, गोंधळ, जोगवा, भक्तीगीत अशा प्रकारांचा त्यात चपखलपणे वापर करण्यात आला होता.

महिलांमध्ये प्रेरणा आणि आत्मविश्वास, निर्णयक्षमता, नेतृत्व या गुणांचा विकास करण्यासाठी व समाजातील  महिलांचे सक्षमीकरण करण्याची शासनाची महत्त्वपूर्ण भूमिका असून यासाठी राज्यामध्ये सहा महसुली विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी आणि साडेतीन शक्तीपिठाच्या ठिकाणी नवदुर्गा: जागरण स्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  गर्भलिंग पूर्व लिंगनिदान चाचणीला प्रतिबंध या विषयावर माहिती पट महिलांना दाखवण्यात आला.                 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,  सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ध्वनिचित्रमुद्रित संदेशाद्वारे  महिलांना संबोधन आणि शुभेच्छा दिल्या.  लोकगीत आणि नृत्य यांसोबत  शासकीय योजनांची सांगड घालून जाणीव जागृती  करण्यात आली. महिला संबंधित विविध योजनांवर आधारित प्रश्न  उत्तर कार्यक्रमात उपस्थित महिलांनी  सक्रिय सहभाग घेतला. अचूक उत्तरे देणाऱ्यांना  बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ख्यातनाम अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांनी केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा