जिल्ह्यात माथाडी कामगार कायद्याच्या अंमलबजावणीची चौकशी करा- पालकमंत्री भुमरे
छत्रपती संभाजीनगर,दि.9(जिमाका)- जिल्ह्यात अनेक
औद्योगिक आस्थापना आहेत. या सर्वच ठिकाणी जेथे माल उतरविणे व चढविणे असे हमालीचे
काम केले जाते, असे श्रमाचे काम करणाऱ्या कामगारांना नियमानुसार वेतन व अन्य
सुविधा मिळणे अपेक्षित आहे. तरी जिल्ह्यात माथाडी कामगार कायद्याच्या अंमलबजावणीबाबत
चौकशी करावी असे निर्देश राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात पालकमंत्री श्री. भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात आढावा घेण्यात
आला. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मिना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी
जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अर्चना खेतमाळीस,
कामगार उपायुक्त राऊत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी चेतन
गिरासे तसेच अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात कामगारांसाठी
राबविण्यात येणाऱ्या मध्यान्न भोजन योजना, माथाडी कायद्याप्रमाणे राबवावयाच्या विविध
योजना, कामगार कल्याणाचे विविध उपक्रम याबाबत माहिती देण्यात आली. इमारत बांधकाम
कामगारांना द्यावयाचे सुरक्षा किट इ. बाबत आढावा घेण्यात आला. याबाबत कामगारांना
नोंदित करुन घेण्यासाठी मोहिम राबवावी, तसेच माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी
होत आहे किंवा नाही याबाबत चौकशी करावी,असे निर्देश पालकमंत्री श्री. भुमरे यांनी
दिले.
00000
Comments
Post a Comment