साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांमध्ये नाविन्यता व सुलभता

 छत्रपती संभाजीनगर, दि.१५(जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या भागभांडवलात वाढ झाली असून  मंजूर भाग भांडवलापैकी २०२२-२३ व २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षात प्रत्येक वर्षी १०० कोटी या प्रमाणे २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच महामंडळातर्फे विविध योजना राबविण्यात येत असून  त्यात अंमलबजावणी होणे व लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी नाविन्यता व सुलभता आणण्यात येत आहे. या योजनांचा संबंधित समाज घटकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना ११ जुलै १९८५ रोजी झाली आहे. महामंडळाच्या भागभांडवलात भरघोस वाढ होऊन महामंडळाचे अधिकृत भागभांडवल १००० कोटी रुपये इतके झाले आहे. मंजूर भागभांडवला पैकी सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक वर्षी १०० कोटी रुपये प्रमाणे २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी शासनाकडून १०० कोटी निधी प्राप्त झाला असून उर्वरित १०० कोटी प्राप्त होणार आहे.

या पार्श्वभुमिवर महामंडळामार्फत खालीलप्रमाणेनाविन्यता आणून सुलभता  करण्यात येत आहे.

 १)एन.एस.एफ.डी.सी.योजना:- (राष्ट्रीय अनुसुचीत जाती जमाती विकास महामंडळ नवी दिल्ली) मुदत कर्ज प्रकल्प मर्यादा पाच लक्ष रुपये, महिला समृद्धी योजना प्रकल्प रक्कम १ लाख ४० हजार रुपये,  लघुऋण योजना प्रकल्प रक्कम १ लाख ४० हजार रुपये. या तीन योजनांसाठी ३५०० लाभार्थ्यांसाठी १०० कोटी रुपयांच्या निधी मागणीचे प्रस्ताव एन.एस.एफ.डी.सी. महामंडळास मान्यतेसाठी सादर केले आहेत. एक महिन्यामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन एन.एस.एफ.डी.सी महामंडळाने दिलेले आहे.

मातंग समाजाच्या युवक, युवतीसाठी देशांतर्गत शिक्षणासाठी तीस लाख रुपये  व परदेशात शिक्षणासाठी चाळीस लाख रुपयांचे कर्ज देण्याचा प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडून मागविले असून पात्र असलेल्या प्रस्तावास एन.एस.एफ.डी.सी च्या निधीमधूनच मंजूरी देवून विद्यार्थ्यास शैक्षणिक कर्जयोजने अंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

२)थेट कर्ज योजना:- प्रकल्प मर्यादा  एक लाख रुपये.या योजने अंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात १२०७ लाभार्थ्यांना १२ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले असून नोव्हेंबर अखेर ८०० लाभार्थ्यांना आठ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तसेच २०२३-२४  या आर्थिक वर्षात भौतिक १६५० व आर्थिक १६ कोटी ५० लक्ष रुपयांची तरतूद केली असून कर्ज मंजूरीची कार्यवाही सुरु आहे.                   

३)बीज भांडवल योजना:-या योजनेची प्रकल्प मर्यादा सात लाख रुपये असून यात महामंडळामार्फत १० हजार रुपये अनुदानासहित २० टक्के रक्कम हिस्सा महामंडळामार्फत दिला जात होता. परंतु लहूजी साळवे आयोगाच्या अभ्यासाच्या १९ मंजूर शिफारशी पैकी एका शिफारशीच्या अनुषंगाने या योजने अंतर्गत महामंडळा मार्फत ४५ टक्के रक्कम ४ टक्के व्याजाने दिली जाते. लाभार्थींचा सहभाग ५ टक्के असून उर्वरित ५० टक्के बँकेचे कर्ज असते. महामंडळाच्या हिश्याची रक्कम २० टक्क्यावरुन ४५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

४)शिष्यवृत्ती योजना:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना मातंग समाजातील प्रतिवर्षी १० वी, १२ वी, व पदवी मध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना १० वी साठी रुपये १ हजार रुपये, इयत्ता १२ वी साठी दीड हजार रुपये व पदवी साठी २ हजार रुपये या प्रमाणे प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येत होती. तथापि,  संचालक मंडळाच्या मान्यतेने चालू आर्थिक वर्षापासून त्यात  भरघोस वाढ करण्यात आली आहे. इयत्ता १० वी साठी ५ हजार रुपये, १२ वी साठी साडेसात हजार रुपये व पदवी- पदविकासाठी १० हजार रुपये व पदव्युत्तरसाठी १२ हजार ५०० रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.

५)अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर ३० लाख रुपये प्रकल्प मर्यादा असलेल्या व व्याज परतावा योजना या महामंडळास लागू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे.

६) थेट कर्ज योजना:- सध्या महामंडळामार्फत एक लाख रुपये प्रकल्प मर्यादा असलेली थेट योजना राबविण्यात येते. परंतु या रक्कमे मध्ये मोठे व्यवसाय करणे शक्य होत नसल्यामुळे योजनेची प्रकल्प मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढविण्याकरिता वारंवार मागणी होत होती. त्या अनुषंगाने प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

७)लहूजी साळवे मातंग समाज आयोगाच्या शासनाने मंजूर केलेल्या ६८ शिफारशी पैकी १९ शिफारशी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाशी सबंधीत आहे. त्याचे दोन टप्पे करुन पहिल्या टप्प्यातील नऊ शिफारशी करिता २३४ कोटी व उर्वरीत १०  शिफारशी करीता २२१ कोटी रुपये असे एकूण ४५५५ कोटी रुपये इतका निधी मिळावा यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

८) अंधेरी मुंबई तसेच तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील जागेबाबत:- मुंबई अंधेरी येथे ३७८ चौ. मी. जागा महामंडळाच्या मालकीची असून या जागेवर अण्णाभाऊ साठे भवन व बहुद्देशीय प्रशासकीय इमारत उभारण्याकरिता ५० कोटी  रुपये तसेच  जिल्हाधिकारी धाराशिव यांनी मातंग समाजाच्या युवक युवतींसाठी विविध व्यवसाय प्रशिक्षणासाठी  नगरपालिका तुळजापूर यांच्या मालकीची एक एकर जागा महामंडळास उपलब्ध करुन दिली आहे. या जागेवर सुसज्य प्रशिक्षण केंद्र ऊभारणी करीता ५० कोटी रुपये निधी मिळण्यासाठी प्रस्ताव शासनास सादर केला आहे.

९) जाचक अटी शिथील करण्याचा प्रस्ताव :- महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात कर्जाचे वितरण करतांना दोन सक्षम जामीनदार शासन निर्णयात नमूद केल्यानुसार घेण्यात येतात. जामीनदार घेण्याकरीता जाचक अटी शिथील करण्याकरिता समाजातील कार्यकर्ते, सामाजिक संघटना व समाजबांधवाकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. त्या अनुषंगाने जाचक अटी शिथील करण्याकरिताचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे,असे महामंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा