ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ: सैनिकांकडूनच मिळते देशसेवेची प्रेरणा- जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

 

 








छत्रपती संभाजीनगर,दि.८(जिमाका):-  देशासाठी त्याग, बलिदान करीत अहोरात्र सेवा करणारे सैनिक हेच आमचे प्रेरणास्रोत असून त्यांच्याकडूनच आम्ही देशसेवेची प्रेरणा घेतो, अशा शब्दात आज जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाची महती सांगितली. ध्वजदिन निधी संकलनात जिल्ह्याने नेहमीच उद्दिष्टापेक्षा जास्त  निधी संकलन केले असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त जिल्हा ध्वजदिन निधी संकलनाचा आज शुभारंभ करण्यात आला. येथील मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र सभागृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मिना, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, जिल्हा कोषागार अधिकारी शेखर कुलकर्णी, कर्नल(निवृत्त)काटकर, कर्नल(निवृत्त) पोळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) सय्यदा फिरासत आदी मान्यवर तसेच वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले की, प्रशासकीय सेवेत काम करतांना सैनिकांकडूनच आम्हाला देशसेवेची प्रेरणा मिळते. त्यांचा त्याग आणि बलिदान हे आम्हा साऱ्यांसाठी प्रेरणेचे स्रोत राहिले आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २९३०० कुटुंबातील व्यक्ति सैन्यदलात आहेत. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्हाप्रशासन म्हणून सैनिक कुटुंबियांचे प्रश्न सोडविणे, त्यांना सेवा प्रदान करणे याबाबत प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती संवेदनशील आहे.  सैन्यदलाला, त्यांच्या कुटुंबियांना, शहिदांच्या परिवाराला प्राधान्याने सेवा देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले. ध्वजदिन निधी संकलनात आपला जिल्हा नेहमीच दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक निधी संकलन करतो ही बाबही गौरवाची आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मिना यांनी सांगितले की, देशासाठी सैनिकांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या त्यागामुळे देश अखंड व सुरक्षित आहे. देशाचे लोक त्यांचे नेहमीच ऋणी असतील. सैन्यदलाच्या व्यक्तिंचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त बगाटे यांनीही सैनिक व त्यांच्या परिवाराच्या त्यागाबद्दल गौरवोद्गार काढले.

प्रारंभी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी स्वतः ‘क्यू. आर. कोड’ स्कॅन करुन ध्वजदिन निधीत आपले योगदान देऊन निधी संकलनाचा प्रारंभ केला. ध्वजदिन निधीतून मदतीचे वितरण, विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या व्यक्तिंचा, गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आले. वंदेमातरम या गीतावर भरतनाट्यम नृत्य सादर करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) सय्यदा फिरासत यांनी तर सहा.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विनायक अनाळकर यांनी आभारप्रदर्शन केले. संजिवनी खोटेले व गौतमी आव्हाड यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा