गंगापूर उपसा सिंचन योजनेचे भुमिपूजन: ‘जलसमृद्धी’ला देणार नैसर्गिक शेतीची जोड-उपमुख्यमंत्री फडणवीस ; प्रत्येक फिडर सौर उर्जेशी जोडून शेतीला विजपुरवठा
छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)- मराठवाड्याशी निगडीत ‘दुष्काळी’ अशी ओळख मिटविण्यासाठी शासनाने एकात्मिक जलआराखडा तयार करुन नियोजन केले आहे. त्याद्वारे मराठवाडा जलसमृद्ध करुन नंतर पीक पद्धतीत बदल व नैसर्गिक शेतीला चालना देऊन शेती विषमुक्त करण्याचा संकल्प, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
गंगापूर भागातील ४० गावांमधील ३० हजार एकर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे भुमिपूजन श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. भुमिपूजन स्थळी विधीवत पूजा करुन व कुदळ मारुन प्रारंभ करण्यात आला. तसेच कोनशीला अनावरणही करण्यात आले. उपस्थित अभियंत्यांकडून श्री. फडणवीस यांनी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.
आपल्या भाषणात श्री. फडणवीस म्हणाले की, ‘जय जवान जय किसान’, हा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी आहे. त्याच दिवशी ‘जय किसान’ हा नारा सार्थ करणारा कार्यक्रम होत आहे. गंगापूर भागात पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी असे प्रश्न होते. मी स्वतः ३० जून २०२३ ला येथे आलो होतो. त्यावेळी जलजीवनचे भुमिपूजन करण्यासाठी आलो होतो. तेव्हाच या योजनेच्या मंजूरीची प्रत आणली होती. आज या योजनेचे भुमिपूजन करतांना मला आनंद होत आहे. सर्व क्षेत्राला ठिबकद्वारे थेट शेतात पाणी देणारी ही एक अभिनव योजना आहे. ते पुढे म्हणाले की, मराठवाड्याची दुष्काळी ही ओळख मिटविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी एकात्मिक जलआराखडा तयार करण्यात आला. त्यावरुन योजना तयार केली. मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी शासनाने १८ हजार ५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. ५००० कोटी सिंचनासठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जे कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्यात आणण्यासाठी ११ हजार कोटी रुपयांचे कामे केली जात आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्प अशा प्रकल्पांना चालना देऊन सिंचनासाठी भरीव तरतूद केली आहे. मराठवाड्यातील ३१ हजार ७५१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता देऊन ४ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची तरतूद झाली आहे,असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जलजीवन मिशन सारख्या योजनेतून प्रत्येक गावात पाणी पोहोचत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून अनेक योजना गावोगावी पोहोचत आहेत. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकातून
आ. प्रशांत बंब गंगापूर उपसा सिंचन योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.
०००००



Comments
Post a Comment