राष्ट्रीय मतदार दिवस: सर्वांगिण उन्नतीसाठी लोकशाही व्यवस्था आवश्यक- डॉ. सुधीर गव्हाणे

 









छत्रपती संभाजीनगर, दि.२५ (जिमाका):-  लोकशाही व्यवस्था म्हणजे वंचितांना सत्ता, प्रतिष्ठा आणि प्रगतीची संधी देणारी व्यवस्था. आपल्या देशात महिलांचे सबलीकरण, प्रत्येक माणसाला समान मताचा अधिकार अशा अनेक अधिकारांची प्राप्ती लोकशाहीमुळेच होऊ शकली. लोकशाही व्यवस्था ही सर्वांगिण उन्नतीसाठी आवश्यक असणारी व्यवस्था आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक, माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी  प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे उपस्थित होते. कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते,उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, प्रभोदय मुळे, अर्चना खेतमाळीस, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले,  सुचिता शिंदे, प्रगती चोंडेकर आदी उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपस्थितांना शपथ देण्यात आली. निलेश कड वर्षिप अर्थ फाऊंडेशन यांच्या वतीने जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. मतदार यादी पुनरिक्षण, अद्यावतीकरण तसेच नवमतदार नोंदणीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या  अधिकारी –कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चित्रकला, निबंध, घोषवाक्य, शॉर्ट फिल्म स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच नवमतदारांना मतदार ओळख कार्ड वितरीत करण्यात आले.

डॉ. गव्हाणे म्हणाले की, लोकशाही रक्षणाची, संवर्धनाची जबाबदारी ही लोकांची असते. कोणत्याही रक्तपाताशिवाय आर्थिक सामाजिक क्रांती करण्याची शक्ती लोकशाही व्यवस्थेत आहे.देशाचे मानवी भांडवल सक्षम करुन ते विकास प्रक्रियेत सहभागी करुन देशाची प्रगती साधणे हे लोकशाही व्यवस्थेचे उद्दिष्ट असते, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, वस्तूत; प्रत्येक व्यक्तिला समान मताचा अधिकार ही एक क्रांती होय. भारताची लोकशाही ही समावेशक लोकशाही  असून विविध विचारधारांचे राजकीय पक्ष हे बहुविधतेचे प्रतिक होय. लोकशाहीचे जतन हेच देशाचे जतन असून मतदानाचा अधिकार बजावून आपणास हे जतन करावयाचे असते.  अहिंसा हा लोकशाहीचा आत्मा आहे,असे त्यांनी सांगितले.

डॉ. लोखंडे म्हणाले, मतदानाचा अधिकार बजावणे अत्यंत आवश्यक आहे. मतदानाबाबत अजिबात हलगर्जीपणा करु नये.आपल्या देशात अन्य देशांच्या तुलनेत खूप चांगली स्थिती आहे. दिवसेंदिवस आपली लोकशाही प्रगल्भ होत आहे.

नायब तहसिलदार संभाजी थोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीत आणि राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा