निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष पार पाडण्यासाठी सज्ज व्हा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- निवडणूक ही निष्पक्ष, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी अधिकारी- कर्मचऱ्यांनी स्वतःला सज्ज ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचना, सर्व प्रक्रिया, नियम यांचा अभ्यास करुन अद्यावत व्हावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे दिले.
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी स्वामी यांनी
आज सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेतला. जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद
लोखंडे, उपजिल्हानिवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय
मुळे, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार सर्व नोडल अधिकरी उपस्थित होते.
मतदान यादी, मतदार संख्या, त्यानुसार वाढ करावयाच्या मतदान केंद्रांची संख्या,
वाहतुक नियोजन, प्रशिक्षणे, सुरक्षा
व्यवस्था, आचार संहिता अंमलबजावणी , माध्यम संनियंत्रण, मतदान यंत्र, मतदान ते
मतमोजणी प्रक्रिया याबाबत सखोल माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके
यांनी सादर केली.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, प्रत्यक्ष कामगिरी उत्तम हवी असेल तर आधी
प्रशिक्षण उत्तम असायला हवे. पुरेसा सराव सर्व सज्जता याचे नियोजन केल्यास कामगिरी
उत्तम होते. त्यादृष्टिने सर्व विभागांनी आपापसात समन्वय राखावा. निवडणूका निष्पक्ष
व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परिपूर्ण सज्जता ही आवश्यक असते. निवडणूक
आयोगाने दिलेल्या सर्व नियम, नियमावल्या, कार्यपद्धतींचा सखोल अभ्यास करावा,असेही
त्यांनी सांगितले.
०००००
Comments
Post a Comment