३५० विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाची छत्रपती शिवरायांना मानवंदना: ‘महासंस्कृती’ महोत्सवाचा प्रारंभ; दि.२२ ते २५ सांस्कृतिक कार्यक्रम








छत्रपती संभाजीनगर, दि.१९ (जिमाका):-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे होत असल्याचे औचित्य साधून ३५० विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त मानवंदना दिली. लेझीम पथकाच्या तालबद्ध सादरीकरणाने क्रांती चौक येथील वातावरण भारावून गेले. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित ‘महासंस्कृती’ या महोत्सवास औपचारिक प्रारंभही येथूनच करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त क्रांती चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास समोर ३५० विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने लेझीम नृत्य सादर करुन महाराजांना मानवंदना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी  करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

महानगर पालीका आयुक्त जी. श्रीकांत, अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, उपविभागीय अधिकारी राठोड, तहसिलदार मुंडलोड, जिल्हा क्रीडा अधिकारी देसाई यांच्यासह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.  जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लेझीम पथकाच्या तालबद्ध कवायतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मनपा आयुक्त जी श्रीकांत,अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, नितीन  बगाटे यांनी  लेझीम पथकात सहभागी होवून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

महासंस्कृती, महानाट्य महोत्सव; दि.२२ ते २५ सांस्कृतिक कार्यक्रम

शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महासंस्कृती व महानाट्य या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. दि.२२ ते २५ पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर वासियांना पाहता येणार आहेत. या आयोजनात पारंपारिक कलांचे सादरीकरण, स्थानिक कलाकारांना वाव, शिवकालिन खेळ, महिलाचे पारंपारिक खेळ अशा विविध बाबींचा अंतर्भाव करण्यात आला असून आज  क्रांती चौकात ३५० विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्य सादर करुन महासंस्कृती महोत्सवाचा प्रारंभ झाला. गुरुवार दि.२२ ते रविवार दि.२५ असे सलग चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमांची रुपरेषा याप्रमाणे-

गुरुवार दि.२२ रोजी शिवछत्रपती वस्तू संग्रहालयास शालेय विद्यार्थ्यांची भेट. सायं.६ वा. आदर्श शिंदे यांचा संगित रजनी कार्यक्रम, स्थळ-मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, खडकेश्वर.

शुक्रवार दि.२३ रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्य रांगोळी- स्थळ- सिद्धार्थ उद्यान. सकाळी १० ते १२ विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन, दुपारी साडेबारा ते २ वा. पर्यंत आलाप वाद्यवृंदासह टीव्ही कलावंतांचा ऑर्केस्ट्रॉ, दुपारी ३ वा. महिलांचे पारंपारिक खेळ,स्थळ- सिद्धार्थ उद्यान. सायं. ६ वा.अवधुत गुप्ते संगित रजनी, स्थळ- मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान खडकेश्वर,

शनिवार दि.२४ रोजी सकाळी १० ते १२ शिवकालीन क्रीडा प्रकारांचे  प्रदर्शन- स्थळ सिद्धार्थ उद्यान. सायं. ६ वा.नंदेश उमप संगित रजनी कार्यक्रम- स्थळ मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, खडकेश्वर.

रविवार दि.२५ रोजी सायं ६ वा. ‘शिवबा’ महानाट्य सादरीकरण- स्थळ मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान, खडकेश्वर.

या सोबतच दि.२३ व २४ रोजी  जिल्ह्यातील अभियांत्रिकी व औषध निर्मिती विभागाच्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे प्रदर्शन सिद्धार्थ उद्यानात लावण्यात येणार असून ते ही नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. स्थानिक लोककलावंतांनाही दि.२२ ते २५ दरम्यान दररोज  मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान येथील मुख्य कार्यक्रमात सादरीकरणाची संधी दिली जाईल. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून सगळ्यांना प्रवेश मोफत आहे,असेही अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी स्पष्ट केले आहे.

००००० 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा