प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा-डॉ.अरविंद लोखंडे

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका):- केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राबविली जात आहे. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या  कारागिर, व्यावसायिकांना या योजनेतून प्रशिक्षण, सहसाहित्य संच व अर्थसहाय्य दिले जाते, या योजनेद्वारे शाश्वत रोजगार निर्मिती करण्यास वाव असल्याने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा,असे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी आज येथे दिले.

 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक आज संपन्न झाली. बैठकीस सूक्ष्म व लघुउद्योग सहसंचालक नरेंद्र इस्टॉलकर, खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे आर.एस.आचारी, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वऱ्हाडे, जिल्हा उद्योग केंद्राचे बहुरे तसेच समिती सदस्य विजय  औताडे, संजय बोराडे, सूरज लोळगे उपस्थित होते.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सेतू सुविधा केंद्रांमार्फत ऑनलाईन अर्ज प्रस्तावाची नोंदणी निर्दोष व्हावी यासाठी तालुकास्तरीय मार्गदर्शन मेळावा आयोजित करावा,असे निर्देश डॉ. लोखंडे यांनी दिले. ग्रामिण भागात २ हजार २८५ तर शहरी भागात २ हजार ४८० अर्ज असे एकूण ४ हजार ७६५ अर्ज प्राप्त झाले आहेत. सेतूसुविधा केंद्र चालक, सरपंच आणि ग्रामसेवक यांना प्रशिक्षण देऊन अधिकाधिक व्यावसायिक व कारागिरांना या योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करावे असे डॉ. लोखंडे यांनी सांगितले. ऑनलाईन प्राप्त प्रस्ताव ग्रामपंचायत तसेच नगरपालिका प्रशासनाकडून तपासावे व जिल्हास्तरीय समितीकडे पाठवावे. तालुकास्तरीय मेळाव्याच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा