ग्रंथोत्सवाचा समारोप: ग्रंथालय चळवळीला बळ देण्याचा निर्धार ;समारोप प्रसंगी मान्यवरांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका):- वाचन संस्कृती रुजविण्यात ग्रंथालय, वाचनालये ही महत्त्वाची भूमिका बजावतात. वाचकापर्यंत चांगले दर्जेदार साहित्य, पुस्तके नेण्याचे काम ह्याच संस्था करतात. त्यासाठी वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी ग्रंथालय चळवळीला बळ देण्याचा निर्धार ग्रंथोत्सव २०२३ च्या समारोप प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय
संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यांच्या विद्यमाने समता
दर्शन वाचनालय सभागृह, समता नगर येथे ‘छत्रपती संभाजीनगर ग्रंथोत्सव 2023’ चे
आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा आज समारोप झाला.या प्रसंगी उत्कृष्ट कार्य
करणाऱ्या ग्रंथालयांना प्रमाणपत्र वितरण आ. विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात
आले.
समारोप प्रसंगी विधान परिषद सदस्य आ.
विक्रम काळे, डॉ. धर्मराज वीर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहाय्यक
ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, मसापचे कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, ज्येष्ठ साहित्यिक
व समीक्षक ऋषिकेश कांबळे, डॉ. राजशेखर बालेकर, मधुकर वैद्य, गुलाबराव मगर, जिल्हा
ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, समन्वय समिती
सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचन चळवळीसाठी
ग्रंथोत्सव आवश्यक- आ. काळे
आ. विक्रम काळे म्हणाले की, आजही जीवनात वाचनाचे
महत्त्व टिकून आहे. दुर्दैवाने वाचनाची सवय लोप पावते की काय, असे सतत वाटत असते. कोरोना
सारख्या जागतिक महामारीमुळे या समस्येत वाढच झाली. वाचन चळवळ टिकविण्यासाठी ग्रंथोत्सवासारख्या
कार्यक्रमांचे आयोजन आवश्यक आहे, असे आ. काळे यांनी सांगितले. वाचन चळवळ वृद्धिंगत
करण्यासाठी तसेच ग्रंथालय चळवळीशी निगडीत प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे
आश्वासनही त्यांनी दिले.
दर्जेदार
पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवावी- डॉ. धर्मराज वीर
समारोप
समारंभाचे अध्यक्ष डॉ. धर्मराज वीर म्हणाले की, हल्ली सोशल मिडियामुळे वाचनावर
परिणाम झाला आहे, अशी ओरड होत असली तरी जगभरात नवी पुस्तके वाचकांपर्यंत येण्याचे
प्रमाण वाढतेच आहे. प्रयत्न लोकांपर्यंत
दर्जेदार पुस्तके पोहोचविण्यासाठी होणे आवश्यक आहे. दर्जेदार पुस्तके लोकांपर्यंत पोहोचविण्यात ग्रंथालयांची भुमिका
महत्त्वाची आहे,असेही डॉ. वीर यांनी सांगितले.ते म्हणाले की, देशाची प्रगती तेथील
वाचनालयांच्या संख्येवरुन ओळखावी. ग्रंथालय चळवळीला चालना देण्यासाठी ग्रंथालय
सेवकांना चांगला मोबदला मिळायला हवा,असेही प्रतिपादन त्यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी
सुभाष साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे यांनी
प्रास्ताविक तर डॉ. विवेक घोलप यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
00000
Comments
Post a Comment