शनिवारी (दि.२३)‘वाचन लेखन’ दिवस- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका):- नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी, त्यांच्या अधिनस्त सर्व कर्मचारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तालुकास्तरावरील निवडणूक कर्मचारी यांनी शनिवार दि.२३ रोजी हा पूर्ण दिवस निवडणूक विषयक कामकाजाची कार्यपद्धत, नियम इ. विषयीचे वाचन करावे व आवश्यक ती टिपणे काढून लेखन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
जिल्हा नोडल अधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी विकास मीना, मनपा अति. आयुक्त रणजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित
होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थित सर्व नोडल अधिकाऱ्यांना निर्देश
दिले की, सगळ्यांनी आपल्यास्तरावरुन आपल्या विषयाशी संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचे
प्रशिक्षण घ्यावे. आपापल्या विषयाशी संबंधित निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांची व नियमांची
तसेच कार्यपद्धतीची सखोल माहिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी शनिवारी दि.२३ रोजी सगळ्यांनी
आपापल्या कार्यालयात अथवा सुयोग्य अशा जागी जाऊन कर्मचारी अधिकाऱ्यांनी आपल्या विषयाशी
संबंधित नियम पुस्तिकांचा अभ्यास करावा. त्याची टिपणे काढावीत. सहा. निवडणूक निर्णय
अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कर्मचारी अधिकारी यांनी वाचन व लेखन केल्याची
खातरजमा करावी असेही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिले. त्यांनी तसे पत्रही
दिले आहे.
०००००
Comments
Post a Comment