पैठण येथे निवडणूक पूर्वतयारी आढावा : मतदारांना आवश्यक सर्व सुविधा द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 



छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- मतदानापासून एकही मतदार वंचित राहणार नाही यासाठी सर्व क्षेत्रीय कर्मचारी, अधिकारी यांनी मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथे निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले.

पैठण येथे आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेत निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसिलदार स्वप्निल चव्हाण, शिक्षक, नोडल अधिकारी, निवडणुकीच्या कामकाजात सहभागी सर्व अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 

जिल्हाधिकारी स्वामी यांनी पैठण विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. सर्व नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांनी आपणास सोपवलेल्या जबाबदाऱ्या योग्य व पारदर्शक पद्धतीने पार पाडून मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध  करुन द्याव्या.ज्यांच्या कडेवर लहान बाळ आहे अशा महिला मतदारांच्या लहान बाळांना सांभाळण्यासाठी पाळणाघराची व्यवस्था, दिव्यांग आणि ज्येष्ठ वयोवृद्ध मतदारांनाही आयोगाच्या निर्देशानुसार व्हिलचेअर, सहाय्यक इ. सुविधा उपलब्ध करून द्याव्या. ‘सक्षम’ ॲप बाबत दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करावी असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. सार्वजनिक ठिकाणी असलेले राजकीय पक्षाचे प्रचार झेंडे किंवा इतर पोस्टर- बॅनर हटविण्याची कारवाई आचारसंहिता पथकाने तात्काळ करून अहवाल आचारसंहिता कक्षात सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा