आरोग्य योजनांशी संलग्नित रुग्णालयांची तपासणी करुन अहवाल सादर करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

 




छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका):- महात्मा फुले जनआरोग्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत संलग्नित रुग्णालयांची तपासणी करुन लवकरात लवकर अहवाल सादर करावा,असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आरोग्य यंत्रणांना दिले.

आरोग्य योजनांशी संलग्नित रुग्णालयात मध्यस्थांमार्फत रुग्णांची अडवणूक, दलाली घेणे इ. तक्रारी समोर आल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज तातडीची बैठक आयोजित केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतिपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. कबीर सैय्यद, जिल्हा समन्वयक डॉ. रवि भोपळे, डॉ. मिलिंद जोशी आदी बैठकीस उपस्थित होते.

आरोग्य योजना अंमलबजावणीत संलग्नित रुग्णालयांचे बाह्यरुग्ण नोंदवही, रुग्ण दाखल नोंदवही, उपचार प्रपत्रे, डिस्चार्ज रिपोर्ट आदी तपासावे. प्रत्यक्ष रुग्णांच्या- नातेवाईकांच्या भेटी घेऊन माहिती घेणे व त्यानंतर वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा. या प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्पष्ट केले.

त्याचप्रमाणे आरोग्य सेवकांपासून ते यंत्रणेतील सगळ्यांना या योजनांबाबत उद्बोधित करावे. अंमलबजावणी यंत्रणेतील संपूर्ण साखळी तपासा, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

तक्रार दाखल करण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सामान्य रुग्णांना व जनतेलाही आवाहन केले आहे की, कुणीही अशाप्रकारे अडवणूक करुन पैशांची मागणी करीत असेल तर असे प्रकार तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणावे. नागरिक आपली तक्रार १८००२३३२२०० या अथवा १५५३८८ या हेल्पलाईन क्रमांकावर करु शकतात. किंवा संबंधित भागातील प्रांताधिकारी, तहसिलदार, जिल्हा शल्य चिकित्स्क, जिल्हा आरोग्य अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचेकडेही तक्रार करावी. 

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा