बाबासाहेबांनी समृद्ध ‘लोकशाही’साठी दिला सामान्यांना मतदानाचा अधिकार- जयदेव डोळे
छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका):- लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य नागरिकाला दिलेल्या मतदानाच्या अधिकाराची तसेच ते मतदान हे निर्भयपणे करता यावे, अशी सुद्धा त्यांनी तरतूद केली,असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांनी आज केले.
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जयदेव डोळे यांचे
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
व प्रबळ लोकशाही करीता मतदानाचे महत्त्व’, या
विषयावर व्याख्यान
आयोजित करण्यात आले. जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
होते. बालसंरक्षण समितीच्या अध्यक्ष ॲड.श्रीमती आशा शेरखाने, अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद
लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके,
उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, मंजूषा मुथा तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, विभागप्रमुख,
अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ
झाला.
जयदेव
डोळे म्हणाले की, लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या चर्चेदरम्यान डॉ. बाबासाहेबांनी लोकशाही
प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला होता. म्हणूनच ‘मत’ देण्याचा अधिकार
हा अमूल्य अधिकार आहे. तो कोणत्याही परिस्थितीत विकता कामा नये, अशा मताचे ते होते.
ते
पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेला आपल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाचा
जाहीरनामा हा सर्वोत्कृष्ट जाहीरनामा होता. मतदान कुणाला करावे? हे मतदारांनी जाहीरनामा
पाहूनच ठरवले पाहिजे. मात्र तसे होतांना दिसत नाही. लोकशाही प्रक्रियेत मतदारांमध्ये जागरुकता निर्माण
करणे आवश्यक असते. लोकशाही मध्ये बहुमत वाल्यांनी अल्पमत वाल्यांवर जुलूम करता कामा
नये असे डॉ. आंबेडकरांचे विचार होते. ते तसे त्यांनी मांडले देखील. केवळ मतदान करतांनाच
नव्हे तर मतदान केल्यानंतरची निर्भयताही आवश्यक आहे,असे बाबासाहेबांचे मत होते.
लोकशाहीची
जाणीव विकसित व्हायला अनेक घटक जबाबदार असतात. लोकांनी आपला प्रतिनिधी कसा असावा हे
ठरविले पाहिजे. आपला प्रतिनिधी हा कुणाच्याही दडपणात राहणारा नसावा. त्याने लोकेच्छेचा
आदर केला पाहिजे. थोडक्यात विरोधकांचे अस्तित्व मान्य करणे, हे लोकशाहीचे खरे सौंदर्य
आहे. मानव विकासाची सर्व मूल्ये भारतीय राज्य घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाविष्ट
केली. त्यामुळे ही घटना अभेद्य आणि अप्रतिम आहे. निर्भीड जनता हे उत्तम प्रतिनिधी निवडते,
असे लोकप्रतिनिधी सर्वोच्च अशा संसदेचे सदस्य असतात. हे सगळे निर्भय मतदानामुळे घडू
शकते, त्यामुळे मतदानाचा अधिकार अमूल्य आहे, असे श्री. डोळे म्हणाले.
‘आम्ही
भारताचे लोक’ हीच खरी ताकद- जिल्हाधिकारी स्वामी
अध्यक्षीय
समारोपात जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे
अनेक पैलू होते. त्यांनी अनेक विषयांत जे लेखन केले आहे ते वाचल्यावर त्यांचे विविध
पैलू कळतात. आपल्या देशातील परिस्थितीनुसार
राज्यघटना तयार करतांना त्यांनी या देशात प्रजेची
सत्ता असावी अशी रचना केली. त्यामुळेच घटनेच्या प्रस्ताविकेतील ‘आम्ही भारताचे लोक’
हा शब्दप्रयोग मोठा उर्जा देणारा आहे. ही खऱ्या अर्थाने लोकांना ताकद देणारी गोष्ट
आहे. मतदानाचे महत्व आणि मताची ताकद ही लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी आवश्यक आहे,असाच
बाबासाहेबांचा हेतू होता. आज घटत जाणारे मतदानाचे प्रमाण ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्यासाठी
मताचे महत्त्व जाणून लोकांनी अधिकाधिक संख्येने मतदान करण्यासाठी आले पाहिजे. त्यासाठी
येत्या निवडणूकीसाठी प्रशासन विविध जनजागृतीपर उपक्रम राबवित आहे,असे त्यांनी सांगितले.
पाहुण्यांचा
परिचय माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास यांनी केला. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी
डॉ. मिलिंद दुसाने यांनी. आभारप्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर व सूत्रसंचालन
प्रविणा कन्नडकर यांनी केले.
०००००
Comments
Post a Comment