‘युवा वर्ग साजरे करणार मतदान पर्व’: नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 







छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने नवमतदारांना  मतदानासाठी प्रोत्साहित करावे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार जनजागृती उपक्रमात सहभागी करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राचार्य यांना केले.

            ‘युवा वर्ग साजरे करणार मतदान पर्व’, या मध्यवर्ती विचारानुसार जिल्ह्यातील अधिकाधिक नवमतदार, विद्यार्थी- विद्यार्थिनी व त्यांच्या मार्फत त्यांच्या पालकांपर्यंत मतदार जनजागृतीविषयक उपक्रम पोहोचविणे व त्यांना मतदानासाठी आवाहन करणे याबाबत आज जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रशासकीय प्रमुख, शिक्षण, उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती.

            स्मार्ट सिटी कार्यालयात ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, स्वीप नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, स्वप्निल सरदार, उपायुक्त अंकूश पांढरे,  शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख,  तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक नागदिवे, उच्च शिक्षण सहसंचालक निंबाळकर, मनपा शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे तसेच जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रशासकीय प्रमुख आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले विद्यार्थी की, जे यंदाच्या निवडणूकीत प्रथमच मतदान करणार आहेत. ते आपल्या महाविद्यालयांचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या मतदानाविषयी त्यांच्यात जागरुकता निर्माण करणे. तसेच महाविद्यालयातील एनएसएस व एनसीसी सारख्या विभागांमार्फत विद्यार्थ्यांना मतदार जनजागृती उपक्रमात सहभागी करुन घेणे, हे आवश्यक आहे.

            जिल्हाधिकारी स्वामी पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांमार्फत मतदार जनजागृतीचे अभिनव व उत्कृष्ट कार्य करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविणे असे उपक्रम राबविता येतील. त्यात महाविद्यालयांनी सहयोग द्यावा. सध्या परीक्षांचा कालावधी आहे. तो गृहित धरुन उपक्रम राबवावे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्राचर्य, प्राध्यापक हा एक उच्च सुसंस्कृत वर्ग असतो. आपणही आपल्या मार्फत आपल्या परिसरातील लोकांना मतदानाचे महत्त्व सांगून त्यांना मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रेरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

             जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी , विविध समाजमाध्यमांमार्फत विद्यार्थ्यांना मतदार जागृती उपक्रमांत सहभागी करुन घेण्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करावे. आपण करीत असलेल्या प्रयत्नांचे रुपांतर हे प्रत्यक्ष निष्कर्ष प्राप्त होण्यात झाले पाहिजे, त्यादृष्टीने नियोजन करावे,असे आवाहन केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा