विशेष लेखः- उष्माघातः कारणे;लक्षणे व उपचार


शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्याचा वापर करणे, प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.

उष्माघाताची लक्षणे

उष्माघात झाल्यावर मळमळ, उलटी, हात पायांना गोळे येणे, थकवा येणे, ४० डिग्री सेल्सीअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, बेशुद्ध अवस्था आदी  लक्षणे दिसून येतात.

उष्माघाताची जोखिम कोणास अधिक

नवजात बालके, लहान मुले, आधीच आजारी असलेल्या व्यक्ति, सतत उन्हात व मेहनतीचे काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर, वयोवृद्ध व्यक्ती ह्या व्यक्तिंना उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते.

 

असा करा प्रथमोपचार

उष्माघाताच्या रुग्णास प्रथम सावलीत आणावे. रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत. कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. हवेशीर व थंड खोलीत ठेवावे. खोलीतील पंखे, कुलर्स, एसी त्वरित चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर आल्यावर त्याला थंड पाणी देऊन डिहायड्रेशन टाळावे. काखेखाली आईस पॅक ठेवावा व कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. शरीराचे तापमान ३६.८ होईपर्यंत प्रथमोपचार सुरू ठेवावा.

जिल्हा आरोग्य आधिकारी यांचा सल्ला

   मराठवाड्यामध्ये सध्या  उन्हाळा चांगलाच तापलेला असून  तापमानाचा पारा ४३ अंशापलीकडे मजल मारत आहे. दुपारच्यावेळी रस्ते निर्मनुष्य असतात. परंतु, ग्रामीण भागामध्ये खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी शेतात राबत असतात. जि. प. आरोग्य विभागाने ग्रामीण जनतेला आवाहन केले आहे की, उन्हामध्ये कष्टाची कामे करणे टाळावे, शेतकऱ्यांनी शेतातील कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमानात करण्याचे नियोजन करावे. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत. सैल पांढरे कपडे किंवा फिक्कट रंगाचे सुती कपडे वापरावेत. उन्हाची तीव्रताअधिक असल्यास बाहेर जाणे टाळावे. प्रवासाला जाताना सोबत पाणी घ्यावे. डिहायड्रेशन होऊ नये याची काळजी घ्यावी. लिंबू सरबत,लस्सी, ताक, नारळ पाणी आदी पेय प्यावे. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, रुमाल, फेटा, छत्री आदींचा वापर करावा. शक्यतो उन्हात जाणे टाळावे, भर उन्हाच्या वेळी कामे करु नये ती उन्हे कमी झाल्यावर वा भल्या सकाळी उरकून घ्यावी.

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष

 उष्माघाताचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज आहे. विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्षाची स्थापना  केली आहे. तेथे रुग्णांसाठी कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, पंखे यासह औषधोपचारासाठी आवश्यक सामग्रीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तिस उष्माघाताचा त्रास झाल्यास तात्काळ नजिकच्या प्राथमि आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.

 

  -डॉ. अभय धानोरकर

  जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. 

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा