विशेष लेखः- डेंग्यु:नियंत्रण व उपाययोजना
दरवर्षी सातत्याने डेंग्यु रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. डेंग्युचे प्रमाण कमी करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय डेंग्यु दिवस दि.१६ मे रोजी साजरा केला जातो. त्या अनुषंगाने या वर्षाचे घोषवाक्य ‘समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्युला नियंत्रित करा’, असे आहे.
जगामध्ये जवळपास ५ कोटी लोकांना या रोगाचा
संसर्ग होतो. भारतातही हा रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो. या रोगामध्ये मृत्यू सुद्धा
होतात. शहरी व दाट लोकवस्तीच्या भागात या रोगाचे प्रमाण अधिक आहे. या आजाराचा
फैलाव ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे. या रोगाची साथ पावसाळ्यात जास्त प्रमाणात
होते.
हा विषाणुजन्य रोग आहे. डेंग्यु विषाणुचे डेंग्यु – १, डेंग्यु-२, डेंग्यु-३, डेंग्यु-४,
असे चार प्रकार आहेत.
प्रसार:- या
रोगाचा प्रसार दुषित एडीस
इजिप्ता नावाच्या डासाची मादी चावल्यामुळे निरोगी व्यक्तीला डेंग्यु रोग होतो. डेंग्यु
विषाणुयुक्त डास मरेपर्यंत दुषित असतो आणि तो अनेक व्यक्तिंना चावुन या रोगाचा प्रसार करतो. डासाच्या
शरीरात डेंग्यु विषाणुची वाढ साधारणात: ८ते १० दिवसात पूर्ण होते. या रोगाचे
प्रसारक एडिस इजिप्ता डास साठविलेल्या स्वच्छ पाण्यात उदा. रांजण, माठ, कुलर्स,
पाण्याचे हौद, घराच्या छतावरील टाकाऊ वस्तु, नारळाच्या कुरवंट्या, टायर, इ.मध्ये पैदा होतात. हे डास दिवसा चावतात. या
डासांच्या पायांवर काळे पांढरे रिंग असतात. म्हणुन या डासांना टायगर मॉस्क्युटो
सुद्धा म्हणतात.
जीवनचक्र:- एडिस इजिप्ती डासाची वाढ चार
प्रकारामध्ये होते.उदा. अंडी, अळी, कोष, डास
अधिशयन काळ :- ३ ते १० दिवसांचा आहे.
आजाराची लक्षणेः-
(अ)डेंग्यु ताप
१) एकाएकी तीव्रताप
२) तीव्र डोके दुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे.
३) दुसऱ्या दिवसापासुन तीव्र डोळे दुखी
४) अशक्तपणा भुक मंदावणे, ताप कमी जास्त होणे.
५) अंगावर पुरळ येणे
(ब) रक्तस्त्रावयुक्त डेंग्यु ताप (डेंग्यु हिमोरेजिक फिवर)
१) डेंग्यु तापाची वरीलप्रमाणे लक्षणे आढळून येतात.
२) त्वचेखाली रक्तस्त्राव होणे.
३) नाकातुन रक्तस्त्राव होणे. रक्ताची उलटी होणे.
४) रक्तमिश्रीत किंवा काळसर रंगाची शौचास होणे. पोट दुखणे.
५) रक्तश्रावयुक्त डेंग्युताप बहुतांशी १५ वर्षाखालील मुलांना होतो. मोठ्या
व्यक्तिंनाही होऊ शकतो.
क) डेंग्यु शॉक सिंड्रोम
:- डेंग्यु मध्ये जेव्हा रुग्ण बेशुद्ध होतो त्याला डेंग्यु शॉक सिंड्रोम असे म्हणतात.
यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते.
रोग निदानः-
रक्तजल नमुना तपासणी :- रक्तजल चाचणी सुक्ष्मजीव शास्त्र विभाग,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर (घाटी) येथे तपासणी
करुन निश्चित रोगनिदान होते.
उपचार:-
या आजारावर निश्चित असे उपचार उपलब्ध
नाहीत. वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक औषधे व विश्रांती घेणे आवश्यक
आहे. अतिशय घाम येणे, वारंवार उलट्या होणे, जिभेला कोरड पडणे अशा परिस्थितीत
ओ.आर.एस. (मीठ साखर पाणी) द्रावणाचा वापर करावा.
दक्षता:-
टॅब ॲस्परीन, ब्रुफेन ई औषधी देऊ नयेत. वैद्यकीय अधिकारी
यांच्या देखरेखीखाली औषधोपचार घेणे. रक्तस्त्रावयुक्त डेंग्युताप (डेंग्यु हिमोरेजिक
फिवर) व डेंग्यु शॉक सिंड्रोम या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक
आहे.
प्रतिबंधात्मक उपाय योजना:-
सर्व्हेक्षण:- प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्व्हेक्षण अंतर्गत रक्त नमुने व रक्तजल नमुने
घेऊन रुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार करण्यात येतो.
डास अळी व
डास नियंत्रण:- डास अळी नियंत्रण ही सर्वात महत्त्वाची कृती आहे. हिवताप, डेंग्यु व
चिकुनगुनिया चे डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतात.डासोत्पती स्थाने:- पावसाळ्यात
साचलेली डबकी, रांजण, हौद, पाण्याच्या टाक्या, कुलर, रिकामे टायर, नारळाच्या करवंट्या,
इत्यादी.
डासोत्पतीस्थाने
नष्टः-आठवड्यातून
एकादा पाणी साठे रिकामे करुन कोरडा दिवस पाळण्यांत यावा.साचलेली डबके व नाल्या
वाहत्या कराव्यात. खड्डे बुजविण्यात यावेत. शक्य नसल्यास या पाण्यावर आठवड्यातून
एकदा रॉकेल, टाकाऊ ऑईल टाकण्यात यावे.
ॲबेटींग:-
आरोग्य विभागामार्फत घरातील सांड पाण्याचे रिकामे न करता येणारे पाणीसाठ्यात योग्य
प्रमाणात ॲबेटीग केले जाते.
जैविक उपाययोजना:- डासोत्पती
स्थानात गप्पीमासे सोडण्यात येतात. हे मासे डासांच्या अळ्या खातात. सर्व आरोग्य
संस्थेत गप्पी मासे मोफत मिळतात.
धुर फवारणी:-
उद्रेकग्रस्त
भागात धुर फवारणी केली जाते. आठवड्याच्या अंतराने दोनदा केली जाते.
आरोग्य संदेश:-
१.
घरातील
पाणीसाठे आठवड्यात एकदा रिकामे करुन घासुन पुसुन कोरडे करुन द्यावे.
२.
डासांपासून स्वत:चे रक्षण करण्यात
यावे. याकरीता डास प्रतिबंधात्मक कॉईल, वड्या, डास प्रतिबंधक क्रीम लावणे,
मच्छरदाणी वापरणे, झोपतांना संपूर्ण अंगावर कपडे घालणे.
३.
आपला परिसर स्वच्छ ठेवा.
४.
आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा.
माहिती स्त्रोतः जिल्हा हिवताप अधिकारी ,
छत्रपती संभाजीनगर
संकलनः जिल्हा माहिती
अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.
०००००

Comments
Post a Comment