जल-मृद संधारण कामांना गती द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका):- वाहून जाणारी माती आणि भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या ही मानवी समुहा पुढील भीषण प्रश्न आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी जल आणि मृदसंधारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
जिल्हा नियोजन सभागृहात आज जिल्हाधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार
अभियान, महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना यांचा जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतला.
उपजिल्हाधिकारी रोहयो अर्चना खेतमाळीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख
तसेच सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार २.० अंतर्गत करावयाच्या कामांचे कार्यान्वयन
यंत्रणानिहाय वर्गीकरण करुन माहिती सादर करण्यात आली. या कामांच्या मान्यतांची प्रकरणे
मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. अभिसरणातून करावयाच्या
कामांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत
जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील गाळ काढण्याच्या कामास वेग देण्यात यावा, असे निर्देश
जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
जिल्हाधिकारी म्हणाले की, जलसंधारण आणि मृदसंधारणाची कामे गतीने
करण्यात यावीत. इतकेच नव्हे तर हे प्रश्न आताच आपणाला भेडसावणारे प्रश्न आहेत. भीषण
पाणीटंचाईला सामोरे जात असतांना थेंब थेंब पाणी अडविण्याचे काम आपण करायला हवे. जिल्हाधिकारी
स्वामी यांनी निर्देश दिले की,ह्या वर्षी ज्या ज्या गावांत पाणी पुरवठा करण्यासाठी
टॅंकरची संख्या जादा आहे. त्या गावांमध्ये
जल पुनर्भरणाचे उपाय राबवा. विहीर पुनर्भरण, छतावरील पाण्याचे पुनर्भरण, बोअरवेल पुनर्भरण
असे उपक्रम गावागावांमध्ये राबवून भुगर्भातील पाणीसाठ्यात भर घाला.
महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजनेच्या कामांचाही त्यांनी
आढावा घेतला. रोहयोच्या कामांची जल व मृदसंधारण कामांशी सांगड घाला. कामे पूर्ण करण्यासाठी
कालबद्ध कार्यक्रम आखा व त्याची अंमलबजावणी करा,असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थितांना
सांगितले.
०००००
Comments
Post a Comment