जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक:अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका):-रस्ते अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना राबविण्यावर भर द्यावा, तसेच वाहनचालक व अल्पवयीन मुलांचे पालक यांचेही यासंदर्भात उद्बोधन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात
पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपप्रादेशीक
परिवहन अधिकारी विजय काठोळे, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता हिमांशु पाटील,
उपअभियंता एच.के. ठाकूर, मनपा अति. आयुक्त रणजीत पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रकाश
चौगुले, मनपा अभियंता ए.बी. देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बडे आदी उपस्थित
होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की, रस्ते अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यात
एकात्मिक वाहतुक व्यवस्थापन प्रणालीअंतर्गत २७ ठिकाणी कॅमेरे लावण्यात येत आहेत. शहरी
व ग्रामिण भागात रस्ते अपघाताच्या संख्येवर नियंत्रण आणणे, वाहन चालवितांना नियमभंग
करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आठ विशेष वाहने तैनात करण्यात येत आहेत. ही वाहने
वेगमर्यादेचे उल्लंघन, हेल्मेट परिधान न करता वाहन चालविणे इ. बाबींवर लक्ष ठेवून तात्काळ
उपाययोजना करतील. त्यात अधिकाऱ्यांमार्फत वाहनचालकांचे समुपदेशनही होईल. जिल्ह्यात
९७ अपघात प्रवण ठिकाणे निश्चित करुन तेथे आवश्यक ते स्थापत्य बदल करण्याची उपाययोजना
सुरु करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले
की, जिल्ह्यात रस्ते अपघात व अपघातात मृत्यू होऊ नये यासाठी रस्त्यांवरील अपघातप्रवण
स्थळे निश्चित करण्यात यावीत. त्यात आवश्यक ते स्थापत्य बदल, दिशादर्शक व सुचना फलक
लावण्याची कारवाई करावी. विनानंबर प्लेट चालणारी वाहने विशेषतः वाळु वाहतुक करणारे
‘हायवा’ यांच्यावर कारवाई करावी. गॅस टॅंकर्ससाठी त्यांच्या नेमून दिलेल्या मार्गांवरुन
वाहतुक करण्याबाबत उपाय करावे. अल्पवयीन वाहनचालकांकडे वाहन चालविण्यास देऊ नये, यासाठी
पालकांमध्ये जनजागृती निर्माण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
०००००
Comments
Post a Comment