टॅंकरमुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘जलसमृद्ध गाव अभियान’ ; जलपुनर्भरणाच्या उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 




 छत्रपती संभाजीनगर,दि.३१(जिमाका):-जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी ‘जलसमृद्ध गाव’ हे अभियान दि.५ जून पासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. यंदा  टंचाईत ज्या गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला अशा गावांमध्ये विहीर, बोअरवेल जल पुनर्भरण तसेच छतावर पडणारे पावसाचे पाणी अडवून संरक्षित करणे ह्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.पर्यावरण दिन ५ जून पासून ह्या अभियानाला सुरुवात करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

            जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रदीप झोड, सहा. आयुक्त पशुसंवर्धन डॉ. रमण इंगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी, उप कार्यकारी अभियंता एम.एम. खान उपस्थित होते तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

असे असेल अभियान

            जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, टंचाई परिस्थितीमुळे यंदा ज्या गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला त्या सर्व गावांमध्ये ‘जलसमृद्ध गाव’ हे अभियान राबवावयाचे आहे. त्यासाठी विहीर, बोअरवेल, छतावरील पाणी जमिनीत शोषखड्ड्याद्वारे संरक्षित करणे इ. उपाययोजना राबवावयाच्या आहेत.

तालुका व गावपातळीवर समिती

 त्यासाठी तालुकास्तरावरील समित्या तयार करण्यात येतील. त्यात उपविभागीय अधिकारी अध्यक्ष तर गटविकास अधिकारी सदस्य सचिव असतील तसेच तहसिलदार, उपअभियंता पाणीपुरवठा, तालुका कृषी अधिकारी इ. हे या समितीचे सदस्य असतील. प्रत्‍येक गावातील जबाबदाऱ्या ग्राम पातळीवरील समितीकडे राहील. तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, ग्रामसेवक हे सदस्य असतील व ग्रामसेवक सदस्‍य सचिव म्‍हणून काम पाहतील.

कालबद्ध कार्यक्रम

दि. १ ते ३ जून- तालुकास्‍तरीय समितीची बैठक घेणे, बैठकीमध्‍ये पूर्ण तालुक्‍याचे या संदर्भातील अंदाजे नियोजन करणे.

दि.३ ते ४ जून- गावनिहाय बैठक घेऊन प्राथमिक तयारी.

दि.५ जून- पर्यावरण दिनानिमित्‍त प्रत्‍येक तालुका व ग्रामपंचायतस्‍तरावर जनजागरण, कार्यशाळा, व्‍याख्‍यान इत्‍यादी आयोजन.

दि.६ ते १३ जून- शासकीय इमारती, विहीरी, बोअरवेल यांचे गावनिहाय सर्व्हेक्षण-माहिती संकलन व आराखडा करणे.

दि.१४ जून- तालुकास्‍तरीय बैठक घेऊन कामांची एकूण संख्या व त्या अनुषंगाने खर्चाचे नियोजन, लोकवर्गणीसाठी प्रयत्‍न.

दि.१५ ते ३० जून- प्रत्यक्ष कामाला सुरुवात करुन संपूर्ण पावसाळाभर पडणारे पावसाचे पाणी साठवून पुनर्भरण करणे.

माहितीचे संकलन

या कालावधीत करण्यात येणाऱ्या पुनर्भरण उपाययोजनांच्या माहितीचे संकलन करुन साठवले जाणाऱ्या पाण्याची आकडेवारी व माहिती तहसिल व पंचायत समिती कार्यालयात संकलित करावी. तसेच गत वर्षीच्या तुलनेत जलसमृद्धतेने झालेल्या फरकाचेही दस्तऐवजीकरण करण्यात यावे असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

सार्वजनिक विहिरींचे प्राधान्याने पुनर्भरण

            या अंतर्गत सार्वजनिक विहीरी, बोअरवेल यांचे पुनर्भरण प्राधान्याने करावयाचे आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी संरक्षित करण्यात येणार आहे. यासोबत जलसंधारण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, खाजगी व्यक्ति, शेतकरी, संस्था, व्यावसायिक प्रतिष्ठाने यांनाही या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा