उन्हाचा तडाखा पाहता नागरिकांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी करु नये; घरबसल्या निकालाची माहिती मिळेल-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर,दि.२(जिमाका):-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मंगळवार दि.४ रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. निकालाची उत्सूकता सगळ्यांनाच असते, त्यासाठी लोक मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करतात. मात्र यंदा उन्हाचा तडाखा व तापमान अधिक असण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करु नये. त्यांना निकालाची फेरीनिहाय माहिती घरबसल्या ऐकता येईल यासाठी प्रशासनाने विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केली आहे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी दिलीप
स्वामी म्हणाले की, मतमोजणी होत असतांना नागरिकांना प्रत्येक फेरीनिहाय निकाल ऐकण्याची
उत्सूकता असते. त्यासाठी नागरिक मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करतात. मात्र यंदा उन्हाळा
व वाढते तापमान पाहता नागरिकांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी करु नये. निकालाची माहिती
देण्यासाठी विविध वृत्त वाहिन्या, जिल्हा प्रशासनाचे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्स, स्थानिक
केबल वाहिन्या यांच्याद्वारे व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना घरबसल्या निकालाची
माहिती मिळेल. तरी नागरिकांनी उन्हाळ्याची परिस्थिती पाहता मतमोजणी केंद्रावर गर्दी
करु नये,असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले आहे.
मतमोजणी केंद्रावर
प्रवेशासाठी ओळखपत्र आवश्यक
मतमोजणी केंद्रावर मतमोजणी कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, मतमोजणी
एजंट यापैकी प्रत्येकाला प्रवेशासाठी निवडणूक विभागामार्फत देण्यात आलेले ओळखपत्र सोबत
आणणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावर ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे
आपली गैरसोय टाळण्यासाठी प्रवेश ओळखपत्र सोबत आणावे. ज्या माध्यम प्रतिनिधींना निवडणूक
आयोगामार्फत प्राधिकार पत्रे देण्यात आले आहे त्यांनी प्राधिकार पत्रे सोबत आणणे आवश्यक
आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर मोबाईल फोन तसेच अन्य कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आत नेण्यास मनाई आहे. माध्यम
प्रतिनिधींना केवळ मिडिया सेंटर मध्येच मोबाईल नेता येणार आहे, याची नोंद घ्यावी व
प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment