कौशल्य विकासातून व्हावे आर्थिक सक्षमीकरण- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर दि.१८ (जिमाका)- कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने जिल्ह्यातील उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्यासाठी सहाय्यभूत प्रशिक्षण द्यावे व अशा कौशल्य विकासातून आर्थिक सक्षमीकरण साधावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
कौशल्य ,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग जिल्हा कार्यकारिणी
समितीची
बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी विकास मीना, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक
मंगेश केदार, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुवर्णा जाधव, महिला आर्थिक विकास
महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक चंदनसिंग राठोड, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य
अभिजीत अल्टे, जिल्हा कौशल्य व उद्योगजकता विभागाचे
सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे उपस्थित होते.
केंद्र
शासनामार्फत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
हिमरू शालीचे उत्पादन व विक्री करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, कौशल्य, रोजगार ,
उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत आयोजित करून जिल्ह्यातील युवकांच्या आर्थिक
सक्षमीकरणासाठी नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी
स्वामी यांनी दिले. बैठकीमध्ये
जिल्हास्तरीय कौशल्य विकास कार्यक्रम आढावा सुरेश वराडे यांनी सादर केला. यात प्रमोद
महाजन ग्रामीण कौशल्य विकास योजना, जिल्हा कौशल्य विकास कृती आराखडा २०२४-२५
अंतर्गत अभ्यासक्रमांना मान्यता, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र
स्थापन करणे, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० विशेष प्रकल्प,
नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन इ. बाबत माहिती देण्यात आली. तज्ञ आणि कार्यक्षम
व्यक्तींची निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी सुचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली.
यावेळी
माहिती देण्यात आली की, प्रधानमंत्री
कौशल्य विकास योजना ४.० अंतर्गत कर्णबधिर युवक युवतींसाठी विकास प्रशिक्षण
कार्यक्रम घेण्यात आला असून ३० जणांनी प्रशिक्षण घेतले. हिमरू शाल विणकर कौशल्य
विकास व उद्योजकता प्रशिक्षण हे ६० जणांनी घेतले. तर पैठणी साडी विणकर कौशल्य विकासाचे
प्रशिक्षण ६० जणांनी घेतले. असे एकूण
१५० जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे असे वराडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी
स्वामी यांनी निर्देश दिले की, नमो महारोजगार मेळावा ऑगस्ट अखेर आयोजित करावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची
अंमलबजावणी करावी. औद्योगिक वसाहतीमध्ये निवासी प्रशिक्षण सुविधा, कौशल्य
विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा म्हणून सेंटर फॉर एक्सलन्स साठी
प्रस्ताव सादर करावा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ जास्तीत जास्त
युवकांना देऊन लघु आणि मध्यम उद्योगामध्ये
मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहे,यासाठी दिलेल्या अटी शर्ती
पूर्ण करणाऱ्यांना लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
०००००
Comments
Post a Comment