जिल्हा प्रशासनाचा सोमवारी (दि.२२) तक्रार निवारण दिवस ; प्रलंबित अर्जांवर कारवाई करुन निपटारा करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 छत्रपती संभाजीनगर दि.१६ (जिमाका)- सध्या जिल्हा प्रशासन शून्य प्रलंबितता अभियान राबवत आहे. दि.३१ जुलै पर्यंत शून्य प्रलंबितता  गाठण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत सोमवार दि.२२ रोजी जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, उपविभागीय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण दिवस पाळण्यात येणार असून यादिवशी सर्व प्रलंबित तक्रारी निकाली काढाव्या असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

            यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी रामदास दौंड, उपजिल्हाधिकारी डॉ.सुचिता शिंदे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी आणि सर्व तहसिलदार दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.       

            जिल्ह्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या शून्य प्रलंबितता अभियानाच्या अनुषंगाने  दि.२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसीलदार कार्यालयात प्राप्त सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या तक्रारींच्या अर्जांचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण दिवस पाळण्यात येणार आहे. लोकांना त्यांच्या विविध कामांसाठी आवश्यक  कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुविधा, दाखले, उपलब्ध करून देणे हा या दिवसामागचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्यात यावी,असे  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

             प्रत्येक कार्यालयांमध्ये शून्य प्रलंबिततेबाबत पूर्तता अहवाल प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी दि.३१ जुलैपर्यंत सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिल्या होत्या. या अभियानात कार्यालयाची  स्वच्छता, विविध अभिलेखांची वर्गवारी, कार्यालयातील पत्रव्यवहार, तक्रारी यांची प्रलंबितता निपटारा करुन  प्रशासकीय सुधारणा व गतिमानता आणणे ह्या अभियानाचा उद्देश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयाने जलसमृद्ध गाव अभियान यशस्वी करण्यासाठी विहीर आणि बोअरचे पुनर्भरण करण्याबाबतच्या सूचनाही जिल्हाधिकारी  स्वामी यांनी  यावेळी दिल्या.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा