गृहनिर्माण संस्थांनी मतदान केंद्रांचे प्रस्ताव दि.१३ पर्यंत द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर दि.११(जिमाका)- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दूसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, २०२४ घोषित केला आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत. सहकार विभागाकडे नोंदणीकृत वा अन्य कोणत्याही संस्थेशी संलग्न अशा ज्या सह. गृहनिर्माण संस्थांमध्ये २०० हून अधिक सदनिका आहेत त्यांनी मतदान केंद्र स्थापन करण्याबाबतचा आपला प्रस्ताव शनिवार दि.१३ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
आयोगाने घोषित
केलेल्या कार्यक्रमानुसार
मोठ्या शहरातील उत्तुंग
व समूह इमारतीमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्याची सूचना केली आहे. सहकार,
पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या दि.२२ ऑगस्ट२०१२ च्या परिपत्रकानुसार सहकारी
गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांना मतदार याद्यांच्या पुनरीक्षण
कार्यक्रमासाठी मतदार केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
केंद्रस्तरीय स्वयंसेवक या नात्याने त्यांनी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेतील मतदार
नोंदणीस पात्र होणारे रहिवासी, तसेच सोसायटीतील जागा सोडून गेलेल्या व्यक्ती व मयत
व्यक्ती यांची यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना पुरविणे आवश्यक आहे.
त्यांनी संबंधित BLO यांना त्यांच्या सोसायटीमध्ये प्रवेश देऊन मतदारांची पडताळणी
करण्यास मदत करावी. अध्यक्ष व सचिव यांनी सोसायटीतील रहिवाशांना मतदार नोंदणी व
दुरुस्ती करुन घेण्याबाबतचे आवाहन करावे. तसेच २०० हून अधिक सदनिका, घरे असणाऱ्या
संस्थांनी आपले मतदान केंद्राबाबतचे प्रस्ताव शनिवार दि.१३ पर्यंत पाठवावे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात हे
प्रस्ताव स्विकारले जातील, असेही कळविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment