कृषी दिन कार्यक्रम: अनुभवाला द्या नवतंत्रज्ञानाची जोड-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर दि.१(जिमाका)- कृषी उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आपले पारंपारिक ज्ञान आणि अनुभवाला नवतंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
माजी मुख्यमंत्री,
हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड येथे
आयोजित कृषी दिनानिमित्त १०० वा शास्त्रज्ञ
व शेतकरी संवाद व पुरस्कार
प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजीमुख्यमंत्री
वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.
वसंतराव नाईक
कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ.इंद्रमणी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी
विकास मीना, कृषी विभागाचे सहसंचालक
तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, कृषी अधिकारी प्रकाश पाटील,
कृषी विज्ञान केंद्राचे केंद्र संचालक डॉ. किशोर झाडे, प्रगतीशील शेतकरी भगवानराव कापसे
यांच्यासह पुरस्कार प्राप्त शेतकरी यांची सहकुटुंब उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव
नाईक यांनी महाराष्ट्रातील कृषी विकासासाठी अद्वितीय कार्य केले. कृषी विद्यापीठाच्या
माध्यमातून होणारे संशोधन मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे. कृषी विद्यापीठातील
संशोधन शेताच्या बांधावर पोहोचले तरच शेतकरी समृद्ध होईल. शेतीला आधुनिकतेची जोड मिळाल्याने उत्पादनात वाढ होईल. शेतकरी बांधवांनी
रासायनिक खतांचा वापर कमी करून मृद संधारण आणि जलसंधारण करण्यात सहभाग घ्यावा. वृक्ष
लागवडीच्या माध्यमातून जमिनीची धूप रोखण्यासाठी प्रयत्न करावे.जलसमृद्ध गाव करण्यासाठीही
शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा व पावसाचे वाहुन जाणारे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी
योगदान द्यावे, असे आवाहन स्वामी
यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते कृषी
विभागाच्या विविध पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषिरत्न पुरस्कार प्राप्त कृषी विभागाचे सहसंचालक तुकाराम
मोटे , युवा
शेतकरी पुरस्कार लक्ष्मण
आहेर, उद्यान पंडित पुरस्कार
प्राप्त बाबासाहेब पडूळ, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त अनिल शेळके, ड्रोन पायलट महिला
शेतकरी सुलोचना शेळके यांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. तसेच कृषी उत्पादन दुप्पट करणाऱ्या १०० शेतकऱ्यांचा
सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
०००००
Comments
Post a Comment