‘चला जाणून घेऊ मतदान केंद्राला’ मतदान केंद्र पुनर्रचना; नवीन स्थापना वेळेत करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 


छत्रपती संभाजीनगर दि.१२ (जिमाका)- मतदारांना मतदान करणे सोईचे आणि सुलभ व्हावे, यासाठी मतदान केंद्रांची पुनर्रचना तसेच २०० हून अधिक सदनिका असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये नवीन मतदान केंद्र स्थापन करण्याबाबतही आयोगाच्या सुचना आहेत. याबाबतचे नियोजन आणि कार्यवाही वेळेत पूर्ण व्हावे यासाठी ‘चला जाणून घेऊ या मतदान केंद्राला ( Know Your Polling Station)’ हा उपक्रम शनिवार दि.१३ व रविवार दि.१४ रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी  घोषित केले.

            ‘चला जाणून घेऊ या मतदान केंद्राला’, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात आज नियोजन व आढावा घेण्यात आला.उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, व्यंकट राठोड, कन्नडचे तहसिलदार  विद्याचरण कडावकर, गंगापूर   तहसिलदार सतीश सोनी, संभाजीनगर तहसिलदार मुनलोड तसेच नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.  तर दूरदृष्यप्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिका मुख्याधिकारी व बीएलओ सहभागी झाले होते. 

            जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की,‘चला जाणून घेऊ या मतदान केंद्राला’ हा उपक्रम दि.१३ व १४ जुलै रोजी जिल्हाभरात राबविला जाणार आहे. दि.१३ रोजी सकाळी ९ वाजेपासून या उपक्रमास सुरुवात होईल.शहरी भागात अप्पर आयुक्त मनपा, मुख्याधिकारी नपा आणि ग्रामिण भागात  तहसिलदार व गटविकास अधिकारी यांच्यावर आयोजनाची जबाबदारी राहिल. बीएलओ, तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत उपस्थित सर्व मतदारांना मतदान केंद्राविषयी माहिती दिली जाईल.त्यात नकाशा व सादरीकरण करुन माहिती दिली जाईल. त्यानंतर मतदारांनी केलेल्या सुचनांमधून माहिती घेऊन मतदान केंद्रात बदल करण्याबाबतची माहिती तयार करुन नंतर प्रत्यक्ष पाहणी, पर्यायी व्यवस्था यांचा अहवाल तयार केला जाईल. यासर्व नोंदी घेऊन त्यावर मतदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत.

            मतदार, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांचे मतदार यादी, मतदान केंद्र याबाबत काही निवेदन  असल्यास ते ही स्विकारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. याबाबत बीएलओ, तलाठी, ग्रामसेवक यांचे प्रशिक्षणही आजच घेण्यात आले.

            तहसिलदार किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यास्तरावर  दि.१४ पर्यंत मतदान केंद्रांबाबतचे अहवाल प्राप्त करुन घ्यावे दि.१५ रोजी त्यावर सोपस्कार करुन प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा