पावसाळी पर्यटनाबाबत पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर दि.९(जिमाका)- ‘वर्षा ऋतूत पर्यटनासाठी लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. तथापि, वर्षापर्यटनाबाबत पर्यटकांनी आपली , आपल्या कुटुंबिय व मित्रांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करावी,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विनोद खिरोळकर यांनी केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या सुरक्षा सुचना याप्रमाणे-

१.      पर्यटनादरम्यान नागरिक व पर्यटकांनी गड किल्ले, तलाव धबधबे, टेकड्या, नद्या, समुद्रकिनारी सावधानता बाळगावी. महिला, बालके, व वयोवृद्ध लोकांची विशेष काळजी घ्यावी.

२.     पर्यटनाकरिता जाण्यापूर्वी पर्यटन स्थळाची सविस्तर माहिती जाणून घ्यावी. तथापि, वर्षाविहाराचे नियोजन करण्यापूर्वी पर्यटन स्थळांचे संभाव्य पर्जन्यमान, वातावरण व त्या स्थळासाठी हवामान खात्याने काही अलर्ट जारी केले आहेत का याची खात्री करावी.

३.     मद्यपान व अमली पदार्थाचे सेवन करून पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये.

४.    धोक्याच्या ठिकाणी फोटोज्, सेल्फी, व्हिडिओ, व रिल्स तयार करू नयेत.

५.    पर्यटनाच्या ठिकाणी वाहन पार्किंग करताना वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

६.     रात्रीच्या वेळी हिंस्रपशू हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनक्षेत्र, गड किल्ले, अभयारण्य इत्यादी दुर्गम ठिकाणाहून सूर्यास्तापूर्वी बाहेर पडावे.

७.    ट्रेकिंगसाठी गडकिल्ले, अनोळखी ठिकाणे ,दुर्गम भागात जाताना स्थानिक वाटाड्या अथवा गाईडची मदत घ्यावी. त्याचप्रमाणे स्थानिकांच्या सूचनांचे पालन करावे. मात्र पर्यटना दरम्यान अतिउत्साह व निष्काळजीपणा टाळावा.

८.     आपत्‍कालीन बॉक्‍स नेहमी आपल्‍याजवळ बाळगावा. ज्‍यामध्‍ये रेडीओ, बॅटरी, पाणी, मेणबत्ती, माचिस, हेल्मेट, रोप, लाईफ जॅकेट, कोरड्या स्‍वरुपातील अन्‍न पदार्थ इ. आवश्‍यक वस्‍तुंचा समावेश असावा.

९.     अतिवृष्टीमुळे धबधब्याच्या ठिकाणी सैल दगड / झाडांच्या फांद्या, माती व दरड कोसळण्याची शक्यता असते, आपण सतर्क रहावे. अतिवृष्टी दरम्यान शक्य असेल तर सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा.

१०. गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी टाळण्याकरिता अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये.

११.  आणीबाणी प्रसंगी मदत करणाऱ्या यंत्रणांचे दूरध्वनी क्रमांक तोंडपाठ करावीत व आपत्कालीन प्रसंगी त्यांच्याशी संपर्क साधावा. (जसे की, ११२ अँब्युलन्स -१०८, अग्निशमन विभाग -१०१, ०२४० २३३ ४०००, जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष शहर – ०२४० २२४०५००, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष ग्रामीण- ०२४० २३८ १६३३, जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष – ०२४० २३३१०७७.

१२. आपत्‍कालीन परिस्थितीत शोध व बचाव कार्य करणा-या पथकाला संपूर्ण सहकार्य करावे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा