उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमात सहभाग द्यावा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 



छत्रपती संभाजीनगर दि.१८ (जिमाका)- जिल्ह्यातील पंधरा वर्षावरील निरक्षरांचे सर्वेक्षण करून त्यांना साक्षर करण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविला जात आहे. या अभियानात शिक्षक, समाजसेवक,  सेवानिवृत्त शिक्षक, विविध सामाजिक संस्था यांनी स्वयंस्फूर्त सहभाग घेऊन जिल्हा शंभर टक्के साक्षर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.                                   

            केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम याची जिल्हास्तर नियमक परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.

            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) ओमप्रसाद रामावत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे, शिक्षणाधिकारी (योजना) अरुणा भूमकर यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.     

             निरक्षर लोकांचे सर्वेक्षण करून त्यांना साक्षर करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, निवृत्त शिक्षक, विविध शिक्षक संघटना तसेच शाळा महाविद्यालयांनी स्वयंस्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. १५ वर्षा वरील व्यक्तींना नव भारत साक्षरता अभियानामध्ये  साक्षर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २०२७ पर्यंत कार्यक्रमाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. पायाभूत शिक्षण,मूलभूत शिक्षण,जीवन कौशल्य व व्यावसायिक कौशल्य व निरंतर शिक्षण अशा पाच विभागांमध्ये  नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविला जाणार आहे.यात जीवन कौशल्य आत्मसात करण्यासाठीही उपक्रम आहेत.

             निरक्षर मुले, महिला, पुरुष यांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. शहरी भागातील निरक्षरांचे सर्वेक्षण महापालिकेमार्फत करण्यात यावे असे, निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील शिफारशीनुसार २०३० पर्यंत सर्व तरुण आणि प्रौढ पुरुष आणि स्त्रिया यांना शंभर टक्के साक्षरता व संख्या ज्ञान संपादन  करण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सर्वांसाठी शिक्षण हे योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक घटक असणार आहे. लाभार्थी आणि स्वयंसेवक शिक्षक याचे सर्वेक्षण शाळेमार्फत करण्यात असून निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी शासकीय अनुदानित, खाजगी शाळा मधील शिक्षकाव्यतिरिक्त शिक्षणशास्त्राचे शिक्षण घेणारे उच्चशिक्षण संस्था मधील विद्यार्थी, पंचायत राज संस्था, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, एनएसएस आणि एनसीसी यांचा देखील स्वयंसेवक म्हणून सहभाग घेण्यात यावा, असे सांगण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी १६,गंगापूर तालुक्यामध्ये १९,कन्नड तालुका २०, खुलताबाद मध्ये ७,फुलंब्री ८, पैठणमध्ये १८,  सिल्लोड मध्ये १४ सोयगाव मध्ये ८ वैजापूर मध्ये १९ व इतर दहा असे एकूण १३९ साक्षरता केंद्र जिल्ह्यामध्ये कार्यरत असून या ठिकाणी निरक्षर व्यक्तींना साक्षरतेचे वर्ग भरवून साक्षर करण्याचे काम केले जात आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा