महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना; प्रोत्साहनपर लाभासाठी दि.७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरण करा
छत्रपती संभाजीनगर दि.२०(जिमाका)- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभास पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महा-आयटी यांनी दि.७ सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या मुदतीत आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यास पात्र शेतकऱ्यांना
त्यांचे आधारप्रमाणीकरण करण्यासाठी ही अंतिम संधी आहे. आधार प्रमाणीकरणानंतरच पात्र
लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना महा-आयटी मार्फत एसएमएस
देण्यात आला आहे. सर्व बँकांनीदेखील पात्र शेतकऱ्यांना याबाबत व्यक्तीश: कळविणे आवश्यक आहे. दि.७ सप्टेंबर नंतर आधार प्रमाणीकरणाची
सुविधा बंद होणार आहे. आधार प्रमाणीकरण करताना आधार क्रमांक किंवा कर्जाची रक्कम चुकली
असेल, तर त्याबाबत शेतकऱ्यांनी तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवुन तक्रारीबाबत आवश्यक
ती कागदपत्रे आपल्या बँक शाखेत तात्काळ जमा करावीत. आधार प्रमाणिकरण बाकी असलेल्या
संबंधीत शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी मुळ आधारकार्ड व बचत खात्याचे पासबुक घेवून
संबंधीत बँकेत किंवा आपले सेवा केंद्र अथवा आपले सरकार सेवा (ASSK) केंद्रावर जाऊन
तातडीने आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ.मुकेश बारहातेयांनी
केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, वि.का.संस्था कार्यालये तसेच तालुका उप/सहाय्यक
निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयांशी संपर्क साधावा.
०००००
Comments
Post a Comment