राष्ट्रीय पशुधन अभियान कार्यशाळा : पशुसंवर्धनातून उद्योजकता विकासाला चालना- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर दि.६ (जिमाका)- पशुपालनाकडे केवळ शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पाहणे उचित नाही. तर पशुपालन व संवर्धनात शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याची क्षमता आहे. पशुसंवर्धनाला आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक मूल्यांची जोड दिल्यास त्यातून उद्योजकता विकासाला चालना देता येईल,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
पशुसंवर्धन
पंधरवाड्यानिमित्त आज राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुपालकांसाठी कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले होते. येथील मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात आयोजित या कार्यशाळेस
जिल्हाभरातील पशुपालक उपस्थित होते.
कार्यक्रमास
प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. प्रशांत चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.
प्रदीप झोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जि.प.) डॉ. सुरेखा माने, सहा आयुक्त डॉ.
रमण इंगळे, तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. विकास नरवडे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक
मंगेश केदार आदी उपस्थित होते. उपस्थित
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यशाळेस प्रारंभ करण्यात आला.
जिल्हाधिकारी
स्वामी म्हणाले की, आपल्या जिल्ह्याला दैनंदिन जितके दुध लागते त्यापैकी निम्मेही
इथे उत्पादन होत नाही. त्यासाठी शेजारील जिल्ह्यातून आपल्याला गरज भागवावी लागते. अंडी,
मांस याबाबतही वेगळी स्थिती नाही. स्वाभाविकपणे दुग्ध उत्पादन, अंडी. कुक्कुटपालन,
शेळी पालन या व्यवसायाला आपल्या जिल्ह्यात खुप वाव आहे. पशुसंवर्धनाला चालना
दिल्यास त्यातून प्रक्रिया उद्योग, विक्री व्यवस्था, वैरण विकास, पशुखाद्य
निर्मिती इ. अशा अनेक क्षेत्रात व्यवसाय व उद्योगाच्या संधी निर्माण होतात.
त्यामुळे पशुसंवर्धनातून आपण उद्योजकता विकास घडवून लहान लहान उद्योजक घडवू शकतो.
त्यातून अनेकांना रोजगाराची संधीही आपण देऊ शकतो. राष्ट्रीय पशुधन योजनेचा
शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी अंगिकार करावा. त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी
उपस्थित पशुपालकांना केले.
दिवसभर
चालणाऱ्या या कार्यशाळेत वैरणविकास व गुणवत्ता पूर्वक व्यावसायिक सायलेज उत्पादन,
शेळीपालन व्यवस्थापन, कुक्कुटपालन, बॅंक अर्थसहाय्य इ. विविध विषयांवर मार्गदर्शन
करण्यात आले.
०००००
Comments
Post a Comment