मच्छीमारांसाठी कार्यशाळा : मत्स्य व्यवसायात महिलांनी सहभाग घ्यावा-डॉ. जी.डी.खेडकर
छत्रपती संभाजीनगर दि.२३(जिमाका)- मत्स्य व्यवसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प असून, महिलांनी एकत्र येऊन मत्स्य सोसायट्या स्थापन करुन मत्स्य व्यवसायात सहभाग घ्यावा व वाढवावा,असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पॉल हर्बर्ट डीएनए बारकोडींग विभागाचे संचालक डॉ. जी.डी. खेडकर यांनी केले.
पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत लक्ष्मणराव इनामदार नॅशनल ॲकॅडमी फॉर को-ऑपरेटिव्ह
रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र, एन.सी.डी.सी, पुणे, सहकार मंत्रालय, भारत
सरकार आणि मत्स्य व्यवसाय विभाग, भारत सरकार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
पॉल हर्बर्ट डीएनए बारकोडींग आणि जैवविविधता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छीमारांसाठी
प्रशिक्षण कार्यशाळा गुरुवारी (दि.२२) आयोजित करण्यात आली. कार्यशाळेस मत्स्य व्यवसाय
विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. मधुरिमा जाधव तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे
संचालक कर्नल विनीत नारायण यांचे तसेच मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांचे सभासद, मच्छिमार
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.जी डी खेडकर यांनी
सांगितले की, गुणवत्तापूर्ण बीजनिर्मिती, बीज संकलन,त्याची उपलब्धता हा मत्स्य व्यवसायातील
यशाचा गाभा आहे. मच्छीमार बांधवांनी कोल्ड स्टोरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजारपेठेतील
उपलब्धता या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मत्स्य व्यवसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प
असून, महिलांनी एकत्र येऊन मत्स्य सोसायट्या स्थापन करायला हव्यात, अशी अपेक्षा व्यक्त
केली.
या कार्यशाळेत मत्स्यव्यवसाय विभागाचे
प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे यांनी ‘मत्स्यव्यवसायातील विविध संधी व शासनाच्या मत्स्यव्यवसाय
विषयक विविध योजनां’बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सहकारी विकास महामंडळ, पुणेचे उपसंचालक गणेश गायकवाड
यांनी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या विविध योजनांची तपशीलवार माहिती दिली. उपसंचालक आक्रुष्टा रितू यांनी मत्स्य शेतकरी उत्पादक
संस्थांसाठी असलेल्या विविध योजनांसाठी प्रस्ताव कसे तयार करावे? यासंदर्भात मार्गदर्शन
केले. पुनीत गुप्ता यांनी आभार व्यक्त केले.
०००००


Comments
Post a Comment