महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण; प्रत्येक जिल्ह्यात होणार एक ‘मधाचे गाव’-रविंद्र साठे

 




छत्रपती संभाजीनगर दि.२३(जिमाका) – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना ग्रामिण भागातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करुन ग्रामविकास घडविण्यात येत आहे. त्या अंतर्गत मध निर्मिती योजनेचा लाभ गावांमध्ये पोहोचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक गाव हे ‘मधाचे गाव’ म्हणून करण्यात येईल,अशी माहिती  महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांनी दिली.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व विभाग मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय (दि.२२ व २३)  प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी श्री. साठे हे बोलत होते.   

प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२२) सकाळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. सहा.मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, कक्ष अधिकारी श्रीमती गीता यादव, यशदा येथील श्रीमती भाग्यश्री वठारे यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस दोन दिवस मराठवाड्यातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

श्री.साठे म्हणाले की,प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम , प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणि मध निर्मिती योजना यांचे समायोजन करुन ग्रामिण भागात स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगार निर्मितीस चालना देण्यात येत आहे. त्यासाठी या योजना राबविणारे, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणारे अधिकारी- कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. प्रशिक्षित झालेले कर्मचारी ह्या योजना लाभार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 दोन दिवसांच्या कार्यशाळेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, श्रीमती गीता यादव यांनी मार्गदर्शन केले.कर्मचाऱ्यामध्ये मंडळाच्या कामकाजाविषयी आत्मीयता निर्माण करणे व परस्पर समन्वय व कार्य नियोजन करणे याबाबत श्रीमती वठारे यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक प्र.जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी धाराशिव श्रीमती महादेवी रणदिवे यांनी केले. सुत्रसंचालन प्र.जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, परभणी बी.एन.जायभाये यांनी केले.  दुसऱ्या दिवशी (दि.२३) महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम व इतर आर्थिक बाबीबाबत श्रीमती भाग्यश्री वठारे यांनी, मंडळाच्या विविध योजना व मंडळाच्या ॲक्ट व आपली भूमिका व जबाबदारी व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, विश्वकर्मा योजनेची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील व अभेय रावतेकर यांनी मार्गदर्शन केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा