अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे- पालकमंत्री अब्दुल सत्तार

 छत्रपती संभाजीनगर दि.४(जिमाका)- जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सिल्लोड ,सोयगाव कन्नड आणि पैठण या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जनावरे दगावली आघेत. हे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. या संयुक्त पंचनामे कृषी, महसुल व ग्रामविकास यंत्रणांनी करावे व तसा अहवाल शासनास सादर करावा असे निर्देश राज्याचे पणन, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिले.

            पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दुरदृष्यप्रणालीद्वारे यंत्रणेची आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिल भोकरे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख तसेच सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती.

            पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी केटीवेअर बंधाऱ्यांचे दरवाजे वाहून गेले आहेत ते दुरुस्त करावे. तसेच  पाझर तलावांची दुरुस्ती, पिकांच्या नुकसानीचे, पडझड झालेल्या घरांचे व इतर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून जिल्हास्तरावर पाठवावे. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदतिच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करावे,असे निर्देश श्री. सत्तार यांनी दिले.

            जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व तालुका व गावपातळीवरील यंत्रणांनी आपापल्या मुख्यालयी राहून आपत्कालीन परिस्थितीत समन्वय राखावा व सतर्कता बाळगावी. पूरपरिस्थितीमुळे स्थलांतर करावयाची गरज भासल्यास स्थलांतर करण्याची जागा निश्चित करून तिथे सुविधा उपलब्ध असल्याबाबतची खातरजमा संबंधित तहसिलदाराने करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी  स्वामी यांनी  दिले. तसेच गणेशोत्सवाची पार्श्वभूमी लक्षात घेता सर्व नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी  स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी साथ रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या यंत्रणा सज्ज व परिपूर्ण ठेवाव्या. नदीकाठच्या व पूरप्रवण गावातील सरपंचांशी समन्वय साधून पुरस्थितीबाबत माहिती संबंधित तहसिलदार यांच्याकडे पाठवावी.

            जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सांगितले की शेत पिकाचे पंचनामे तात्काळ गटविकास अधिकारी ,तहसिलदार व सरपंच यांच्या उपस्थितीत पूर्ण करावेत. प्रपत्र अ, ब, क ,ड यामध्ये सदरील माहिती भरून पिकाच्या सर्वेक्षणासाठी गावातून प्राथमिक नुकसानीचा अंदाज योग्य प्रकारे भरावा.

            जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भोकरे यांनी सांगितले की ज्या केटीवेअर बंधार्‍यांचे गेट वाहून गेले आहेत किंवा नादुरुस्त झाले आहेत  त्यांचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल संबंधित यंत्रणेने द्यावा.

            निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी माहिती दिली की, जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यांच्या कुटुंबियांना द्यावयाच्या आर्थिक मदतीची प्रक्रिया पूर्ण करावी. जायकवाडी धरण ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने कोणत्याही क्षणी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येऊ शकतो. या अनुषंगाने पैठण, वैजापूर व गंगापूर येथील यंत्रणांनी सतर्क राहून समन्वय ठेवावा. नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा