राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम: जिल्ह्यात ४ लाख ९२ हजार प्रौढ व्यक्तिंना देणार बीसीजी लस; दि.३ पासून विशेष मोहिम

 छत्रपती संभाजीनगर दि.१ (जिमाका)- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत सन २०२५ पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित केले असून त्यानुसार जिल्ह्यातील १८ वर्षावरील पात्र ४ लाख ९२ हजार प्रौढ नागरिकांना मंगळवार दि.३ पासून बीसीजी लसीकरण करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

            राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १८ वर्षे वयावरील नागरीकांना बीसीजी लसीकरण मोहीम सुरु करण्यात येणार आहे. बीसीजी लस लहान मुलांप्रमाणेच प्रौढांसाठीही उपयुक्त आहे. लस इतर आजारांविरोधातही परिणामकारक ठरल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. जिल्ह्यात अतिजोखामीच्या गटातील ४ लक्ष ९२ हजार लाभार्थी असणार आहेत.  त्यापैकी लस घेण्यासाठी संमती दिलेल्या व TB-Win पोर्टलवर नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व खासगी, सरकारी यंत्रणेने एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केले. लसीकरण सत्राचे नियोजन व अंमलबजावणीसाठी करण्याची जबाबदारी जिल्हा माता व बालसंगोपन आरोग्य अधिकारी  डॉ. विशाल बेंद्रे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वैशाली डकले हे पार पाडणार आहेत.यासंदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळा ड्युटोल सभागृह, एम.जी.एम. येथे संपन्न झाली. त्यानंतर प्रत्येक ब्लॉक लेव्हल व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सर्व आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेवीका यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

लस कोणाला द्यावी?

पूर्वी टीबी चा उपचार घेतलेला असा क्षय रुग्ण.

क्षय रुग्णाच्या सहवासीत राहिलेली व्यक्ती तथा सध्या क्षय रुग्णाच्या सहवासात राहत असलेले व्यक्ती.

६० वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती व त्यापुढील ज्येष्ठ नागरिक.

मधुमेहाचा पूर्व इतिहास असलेले व्यक्ती (स्वयं घोषित).

असे व्यक्ती ज्यांना धुम्रपानाचा पूर्व इतिहास आहे.

ज्या व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स १८ पेक्षा कमी आहे.

लस कोणाला द्यायची नाही?

अठरा वर्षापेक्षा कमी वय असलेली व्यक्ती.

जो व्यक्ती संमती पत्रावर सही करणार नाही असे व्यक्ती.

या व्यक्तींना एच आय की चा पूर्व इतिहास आहे असे व्यक्ती.

गरोदर व स्तनदा माता.

मागील तीन महिन्यात रक्त चढवून घेतलेले आहे असे व्यक्ती.

तरी सर्व नागरीकांनी बीसीजी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी. दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा माता व बालसंगोपन आरोग्य अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वैशाली डकले यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा