प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५; ऑनलाइन अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर, दि.१३ (जिमाका)- शौर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान पर्यावरण, कला-संस्कृती आणि नवोन्मेष या क्षेत्रात राष्ट्रीयस्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. सन २०२५ या वर्षासाठी या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर.एन चिमंद्रे यांनी कळविले आहे. अर्ज नामांकन https://awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय ५ वर्षापेक्षा अधिक व दि.३१ जुलै २०२४ रोजी १८ वर्षापेक्षा कमी आहे. तसेच ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी केली आहे. त्यांचे प्रस्ताव संकेतस्थळावर स्वतः मुले किंवा त्यांच्यावतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज दि.१५ सप्टेंबर पर्यंत स्विकारले जाणार आहेत. तरी प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार साठी जिल्ह्यातील बालकांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. एन. चिमंद्रे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment