राजे यशवंतराव होळकर महामेष योजना; ७५ टक्के अनुदानावर मेंढी गटासाठी ऑनलाईन अर्ज मागविले

 छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका):- जिल्ह्यात मेंढी पालन व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्यातील भटक्या जमाती व तत्सम (भ.ज.क.) समाजातील पशुपालकांना बळ देण्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात येते. या योजने अंतर्गत ७५ टक्के अनुदानावर मेंढी गट देण्यात येतो. त्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन.एस.कदम यांनी केले आहे.

            राज्यातील भटक्या जमाती - क प्रवर्गातील धनगर आणि तत्सम जमातीच्या उन्नतीसाठी शासनाच्या वतीने राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ मेंढी पालन करणाऱ्या कुटुंबाना देण्यात येतो.

            या अनुदान योजनेतुन जुन ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी मेंढ्यासाठी चराई अनुदान, मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी तसेच कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाते. त्यासाठी दि.२६ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे,असे अवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.एन.एस. कदम यांनी केले आहे.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत स्थायी आणि स्थलांतरीत पद्धतीने मेंढी पालनासाठी पायाभूत सोयीसुविधांसह २० मेंढ्या व १ मेंढा नर मेंढा गटाचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, सुधारीत प्रजातीच्या नर मेंढ्याचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, मेंढी पालनासाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ७५ टक्के अनुदान दिले जाते.

मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करुन देण्यासाठी ७५ टक्के अनुदान, हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्यासाठी, गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदीसाठी ५०टक्के अनुदान, पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर आणि तत्सम जमातीच्या पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.एन.एस. कदम यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा