विधानसभा निवडणूक २०२४: मतदानाचे महत्व स्वतः ओळखा आणि इतरांनाही सांगा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी ;देवगिरी महाविद्यालयात युवकांशी संवाद

 










छत्रपती संभाजीनगर, दि.१८ (जिमाका):- मतदान हे आपले कर्तव्य आहे. युवकांनी स्वतः मतदानाचे महत्त्व ओळखावे आणि मतदान करावेच मात्र त्यासोबत त्यांनी इतरांनाही मतदानाचे महत्व सांगावे व आपल्या आसपासच्या मतदारांमध्ये जनजागृती करुन आपले योगदान द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

            देवगिरी महाविद्यालयात आयोजित युवासंवाद या कार्यक्रमातून आज मतदार जनजागृती करण्यात आली. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, स्वीप नोडल अधिकारी दीपाली थावरे, प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर तसेच प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, लोकशाहीमुळे आपल्याला ज्या सामाजिक जीवनात विविध अधिकार आणि हक्क मिळतात त्यामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगू शकतो. आपला देश त्यामुळे प्रगती करु शकतो. त्यासाठी योग्य प्रतिनिधीत्व असणे आवश्यक आहे. जास्त मतदान झाल्यास योग्य प्रतिनिधित्व होते. कमी मतदान झाल्यास कमी प्रतिनिधीत्व होते. त्यासाठी मतदानाचे प्रमाण अधिक असणे आवश्यक आहे. युवकांनी स्वयंस्फूर्तीने मतदानासाठी पुढे यावे व आपला लोकशाहीचा हक्क बजवावा,असे आवाहन त्यांनी केले.

            जिल्हाधिकारी स्वामी पुढे म्हणाले की, आपल्या आयुष्यात आपण सुसंस्कारित होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करावी. आपल्या आई वडील गुरुजनांचा आदर करणे, व्यसनांपासून दुर राहणे, चांगल्या सवयींचा अंगिकार करणे, पर्यावरण रक्षण, वृक्षरोपण अशा विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचे योगदान दिले पाहिजे,असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

            मतदार जनजागृती उपक्रमाविषयी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी माहिती दिली. प्राचार्य डॉ. तेजनकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महाविद्यालयाच्या संगित विभागाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीसाठी पोवाडा व गीते सादर केली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा