जिल्हा प्रशासनाच्या ‘युवा संवाद’ उपक्रमास प्रारंभ; सुशिक्षित होता होता सुसंस्कारित व्हा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.७ (जिमाका) :- जिल्हा प्रशासनाच्या वतीने युवकांशी संवाद साधून त्यांना विधायक बाबींविषयी अवगत करण्यासाठी ‘युवा संवाद’ या उपक्रमास आजपासून प्रारंभ झाला. युवकांनी शिक्षण घेऊन सुशिक्षित होता होता सुसंस्कारितही व्हावे, हे समाजाच्या आणि देशाच्या हिताचे आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी युवकांशी संवाद साधतांना केले.
युवा संवाद
हा उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यास आजपासून सुरुवात झाली.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने हे आयोजन शासकीय
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांच्यासह तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक अक्षय जोशी, प्राचार्य डॉ.
संजय डंभारे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
स्वामी म्हणाले की, आजचा युवक हा देशाचा जबाबदार नागरिक आहे. हा नागरिक सुशिक्षित
असण्यासोबच सुसंस्कृत असणेही तितकेच आवश्यक आहे.
व्यक्तिमत्व चांगले असणे म्हणजे त्याचा बौद्धिक विकास झालेला असणे होय. आधुनिकतेच्या
नावाखाली आपण आपल्या संस्कारापासून दूर जात आहोत.
जिल्हाधिकारी
स्वामी यांनी सांगितले की, मुलांचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा सुद्धा
संस्काराचा भाग आहे. पालकांनी मुलांवर मुलींबाबत जबाबदारीने वागण्याचा संस्कार
घरातच करावयास हवा. बाहेर एकटी भेटलेली मुलगी ही संधी नसून तीच्या संरक्षणाची तुझी
जबाबदारी आहे असे संस्कार केले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचे महत्त्व
ओळखणे आवश्यक आहे.
आदरस्थानांबाबत
बोलतांना जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, बऱ्याचदा आपण आई वडील, गुरुजनांशी सहज
खोटे बोलून त्यांना फसवत असतो. मात्र ही त्यांची फसवणूक नसून आपली स्वतःची फसवणूक
आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास हवा
मात्र फाजिल आत्मविश्वास नसावा. डोळसपणे जगतांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक
आपणास ओळखता आला पाहिजे. अंतिमतः बौद्धिक विकास हाच खरा विकास आहे,असे
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. युवकांनी मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावायला
हवे. गर्भलिंग निदान आणि गर्भपातासारख्या कुप्रथांविरुद्ध समाजात जनजागरण करायला
हवे. पर्यावरण रक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती, सोशल मिडियावरील जबाबदार वर्तन अशा
विविध क्षेत्रात आपण आपले योगदान देऊ शकतात,असे आवाहनही त्यांनी केले.
युवासंवाद
या कार्यक्रमात व्यक्तिमत्व विकास आणि सुक्ष्म कौशल्य याविषयी डॉ. नितीन भस्मे,
सोशल मिडीया आणि सायबर क्राईम याविषयी प्रा.
राहुल भारती, शासकीय योजनांविषयी डॉ. प्रशांत सामकुवर, डॉ. आदेश जिंतुरकर यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
०००००
Comments
Post a Comment