मतदानाचा टक्का वाढणे लोकशाहीला पोषक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 






छत्रपती संभाजीनगर,दि.१८(जिमाका)- मतदानाचे प्रमाण जितके अधिक तितके ते निकोप लोकशाहीसाठी पोषक असते तर कमी मतदान होणे हे लोकशाहीच्या निकोपतेला हानी पोहोचविते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपण साऱ्यांनी मतदान करावे व इतरांनाही  मतदानाचे कर्तव्य बजावण्यास सांगावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आज मतदार जनजागृती उपक्रमांतर्गत महिला मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे  विभागप्रमुख डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. प्रभा खैरे, डॉ. मंगला बोरकर, डॉ. वर्षा रोटे, डॉ. वैशाली उणे,डॉ. विनोद मुंदडा, डॉ. बजाज, डॉ. भारत सोनवणे, प्रशासकीय अधिकारी डी.पी. गोधणे आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, अपल्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कित्येकांनी त्याग,बलिदान केले. आपल्याला भारतीय राज्य घटनेने मतदानाचा अधिकार दिला. कोणत्याही संघर्षाविना मिळालेल्या या मौल्यवान अधिकाराचा आपण परिपूर्ण वापर केला पाहिजे. आपण आपला मतदानाचा अधिकार वापरुन लोकप्रतिनिधींची निवड केली पाहिजे. निवड झालेले लोकप्रतिनिधी हे पुरेशा लोकांचे प्रतिनिधित्व करणारे असले म्हणजे ते योग्य प्रतिनिधीत्व ठरते. त्यातून लोकशाही समृद्ध ठरते. समृद्ध लोकशाही, निकोप लोकशाहीसाठी मतदानाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे,असे सांगून त्यांनी सगळ्यांनी मतदान करावे. मताचा अधिकार व हक्क बजावावा व इतरांनाही सांगावे असे आवाहन केले.

            प्रास्ताविक डॉ. शिवाजी सुक्रे यांनी केले. डॉ. वर्षा रोटे व डॉ. गायकवाड यांनीही उपस्थितांना मतदानाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन डॉ. अर्चना वरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. शुभा म्हसलेकर यांनी केले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा