गुणवंत व संस्कारीत विद्यार्थी घडविणे म्हणजे शिक्षण; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची शिक्षण विभागासाठी ‘दशसूत्री’

 



छत्रपती संभाजीनगर,दि.४(जिमाका)- शालेय शिक्षण घेतांना विद्यार्थ्याच्या कोवळ्या वयातच त्यावर संस्कार करुन शिक्षण द्या. त्यामुळेच देशाचा उद्याचा नागरिक गुणवंत आणि संस्कारीत होईल, असे गुणवंत आणि संस्कारीत विद्यार्थी घडविणे म्हणजेच शिक्षण होय,अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज शिक्षण विभागासाठी ‘दशसूत्री’ कार्यक्रम दिला. आगामी या काळात शाळांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

येथील देवगिरी महाविद्यालयात शिक्षण विभागाची जिल्हास्तरीय कार्यशाळा आज पार पडली. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर सभागृहात आयोजीत या कार्यशाळेस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (योजना) अरुणा भुमकर तसेच जिल्ह्यात १२८ केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी स्वामी यांनी शिक्षण विभागासाठी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवितांना राबवावयाच्या शैक्षणिक उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करण्यासाठी शाळांमध्ये कोणते उपक्रम राबवावे याविषयी आपले सादरीकरण केले.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, एकंदर शैक्षणिक प्रगतीचा आलेख पाहता त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सद्यस्थिती लक्षात घेता त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजातील सर्वस्तरातील विद्यार्थी हे गुणवत्तापूर्ण असले पाहिजे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी जुन्या अध्यापन पद्धतीत बदल करुन साचेबद्ध शिक्षण पद्धतीत आवश्यक सुधारणा करणे आवश्यक आहे. हे करत असतांना संस्कार, संस्कृतीपासून मुले दूर जात आहेत हे ही एक वास्तव आहे. मुलांमध्ये देशप्रेम, आईवडील गुरुजनांविषयी आदरभाव याचा अभाव दिसून येत आहे, असेही त्यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षणादरम्यानच मुलांवर या संस्कारांचे बीजारोपण केले तर देशाचे भविष्य उज्ज्वल होईल.यावर उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी स्वामी यांनी दहा सुत्रे सांगितली.  त्याद्वारे विद्यार्थ्याच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढ करत असतांना त्यांचे आरोग्य, आनंददायी शिक्षण, तंत्रस्नेही विद्यार्थी घडविणे, महिलांविषयी आदरभाव, स्व अभिव्यक्तिस प्रोत्साहन देणे, कौशल्य विकास करणे असे विविध उपाय त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, शिक्षक हा केवळ एक पेशा नसून देशाची भावी पिढी घडविण्याचे काम आपण करीत असतात. याचे भान ठेवून आपण हा कार्यक्रम आपल्यामार्फत शाळाशाळांमध्ये राबवावा व आपल्या जिल्ह्यातून चांगले विद्यार्थी घडवा. हेच विद्यार्थी उद्याचे देशाचे आधारस्तंभ असतील.

प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांची दशसूत्री

गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्रदान करणे.स्पर्धाक्षम,आरोग्यक्षम,संस्कारक्षम, महितीतंत्रज्ञान कुशल व तंत्रस्नेही विद्यार्थी घडवणे.कौशल्यपूर्ण व स्वावलंबी विद्यार्थी घडवणे. आनंददायी, नाविन्यपूर्ण व रचनात्मक शिक्षण देणे.मुलींची सुरक्षितता, महिलांचा सन्मान वाढवणे त्यांच्यातआत्मविश्वास जागृती करणे.स्वअभिव्यक्तीस प्रोत्साहन देऊन सुप्त गुण शोधून त्यास चालना देणे,नवशिक्षण पद्धतीचा अवलंब करुन अद्यावत ज्ञानमय शिक्षक तयार करणे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा